Prashant Koratkar Interim Bail Rejected | छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

कोल्हापूर : Prashant Koratkar Interim Bail Rejected | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे आता कोरटकर याच्या अडचणी वाढल्या असून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची बाजू वकील असीम सरोदे यांनी मांडली होती. सरकारी वकील विवेक शुक्ला यांनीदेखील जोरदार युक्तिवाद केला. तर आरोपी प्रशांत कोरटकर याची बाजू वकील सौरभ घाग यांनी मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर प्रशांत कोरटकर याच्या अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी १७ मार्च रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने या जामीन अर्जावरील निकाल १८ मार्चपर्यंत राखून ठेवला होता. आता हा निकाल समोर आला असून न्यायालयाने कोरटकरला अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे.
प्रशांत कोरटकरने काही दिवसांपूर्वी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन केला होता. हा फोन करून त्याने सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे. सोबतच यावेळी कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याचाही आरोप आहे. याच प्रकरणात कोरटकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.