MP Pradeep Purohit | ‘पंतप्रधान मोदी हे मागील जन्मात छत्रपती शिवाजी महाराज, देशाच्या विकासासाठीच त्यांचा पुनर्जन्म’, भाजप खासदाराच्या वक्तव्याने नवा वाद

दिल्ली : MP Pradeep Purohit | महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलेलं आहे. अशातच आता भाजप खासदाराने शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. ‘पंतप्रधान मोदी हे मागील जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते’, असे विधान ओडिशातील बारगड येथील भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी संसदेत केले आहे. खासदाराच्या या वादग्रस्त विधानामुळे आता सर्व स्तरातून टीका केली जात आहे.

लोकसभेत बोलताना प्रदीप पुरोहित म्हणाले, ते एका संताला भेटले होते. संताने त्यांना सांगितले होते की, पंतप्रधान मोदी हे त्यांच्या मागील जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते. पंतप्रधान मोदी हे प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला विकास आणि प्रगतीकडे नेण्यासाठी पुनर्जन्म घेतला आहे.

भाजप खासदाराच्या या विधानाचा काँग्रेससह अनेक विरोधी सदस्यांनी निषेध केला आहे. ‘जर या टिप्पणीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याचा विचार करावा’, अशी विनंती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अध्यक्षांना केली आहे. खुर्चीवर बसलेले दिलीप सैकिया यांनी प्रदीप पुरोहित यांच्या विधानांची चौकशी करण्याचे आणि त्यांना सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत टीका केली आहे. ” अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्याचे आणि महाराष्ट्रातील तसेच जगभरातील शिवप्रेमींची अस्मिता दुखावण्याचे नियोजनबद्ध कारस्थान भाजपच्या नेतेमंडळींकडून केले जात आहे.

या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा जिरेटोप नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर बसवून शिवरायांचा घोर अपमान केला. आणि आता या भाजप खासदाराचे हे घृणास्पद वक्तव्य ऐका… शिवरायांचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजपचा आम्ही जाहीर निषेध करतो. भाजप शिवद्रोही आहे. शिवरायांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. नरेंद्र मोदींनी त्वरित देशाची माफी मागावी आणि या खासदाराला निलंबित करावे”, अशी भूमिका खासदार वर्षा गायकवाड यांनी मांडली आहे.