Kalepadal Pune Crime News | पुणे : पहाटे दुचाकी ढकलत नेत होता, पोलिसांनी संशयावरुन ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाकडून चार दुचाकी, घरफोडीचे गुन्हे केले उघडकीस (Video)

पुणे : Kalepadal Pune Crime News | पहाटेच्या सुमारास एक जण दुचाकी ढकलत नेत होता, गस्त घालणार्या पोलिसांना पाळून तो पळून जाऊ लागला. तेव्हा बीट मार्शल यांनी त्याला पकडले. चौकशीत त्याच्याकडून घरफोडीचा गुन्हा आणि चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. या १६ वर्षाच्या मुलाकडून एकूण १ लाख ९२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे व विशाल ठोंबरे हे १५ मार्च रोजी पहाटे गस्त घालत होते. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक जण दुचाकी ढकलत घेऊन जाताना दिसला. पोलिसांना पाहिल्यावर तो पळून जाऊ लागला. तेव्हा बीट मार्शल अंमलदारांनी त्याचा पाठलाग करुन पकडले. त्याला वाहनासह पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी चौकशी केल्यावर तो वाहन चोरी करुन घेऊन जात असल्याचे सांगितले. अधिक तपास करता तीन ठिकाणी वाहन चोरी केल्याचे उघडकीस आले. काळेपडळ, हडपसर, वानवडी व कोंढवा पोलीस ठाण्यात चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. काळेपडळ येथील एक घरफोडी त्याने केल्याची कबुली दिली. या पाचही गुन्ह्यातील ९ हजार रुपये रोख व वाहने असा एकूण १ लाख ९२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही वाहने तो मौजमजेसाठी वापरत होता.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड, अमित शेटे, पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, पंधरकर, सद्दाम तांबोळी, दाऊद सय्यद शाहिद शेख यांनी केली.