Satara Crime News | प्रतिष्ठित डॉक्टरला हनिट्रॅपच्या जाळ्यात ओढलं, 1 कोटींच्या खंडणीची मागणी, पोलिसांनी असा केला पर्दाफाश

सातारा : Satara Crime News | एका प्रतिष्ठीत डॉक्टरला या हनिट्रॅपच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून तब्बल १ कोटीची खंडणी मागण्यात आली. या संपूर्ण घटनेने संबंधित डॉक्टर आणि त्यांचे कुटुंब हादरून गेले होते. दरम्यान प्रसंगावधान राखत पावले उचलल्याने ज्यांनी हा हनीट्रॅप रचला त्यांचा पर्दाफाश झाला आहे.

खंडाळा येथील डॉक्टरची विविध ठिकाणी तीन हॉस्पिटल आहेत. ते तेथील प्रतिष्ठित डॉक्टर समजले जातात. त्यांच्या दवाखान्यात एक तरुणी कामाला होती. मात्र काही दिवसांपूर्वी ती अचानक बेपत्ता झाली. याबाबतची तक्रार शिरवळ पोलीस स्थानकात करण्यात आली होती. दरम्यान त्या तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडिओत ती संबधीत डॉक्टर बरोबर दिसत होती. याचाच गैरफायदा घेत डॉक्टरांसाठी हनीट्रॅप रचण्यात आला.

दरम्यान व्हिडिओ डॉक्टरांना पाठवून तो सार्वजनिक न करण्यासाठी १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. ६ मार्चपासून हा सर्व प्रकार सुरु होता. डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना माहिती देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोलिसांनी सांगितलेल्या सूचनेनुसार डॉक्टरांनी खंडणीखोरांना १ कोटी देण्याचे मान्य केले.

त्यानुसार रामेश्वर मंदीर परिसरात खंडणी देण्याचे निश्चत झाले. मात्र त्याचवेळी पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचला. डॉक्टर आणि त्यांची पत्नी खंडणीचे पैसे घेवून रामेश्वर मंदीरा जवळ पोहोचले. तिथं ते खंडणीखोराची वाट पाहात बसले होते. शिवाय पोलीसही साध्या वेशात तिथे उपस्थित होते.

काही वेळाने त्याठिकाणी दुचाकीवरून दोघे आले. डॉक्टर दाम्पत्याने त्यांना खंडणीची रक्कम दिली. त्याचवेळी पोलिसांनी या खंडणीखोरांवर झडप टाकली. त्यांच्याकडून दिड लाख रुपये हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी नितिन प्रधान (वय-२०) आणि दत्ता आप्पाराव घुगे (वय-२४) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. संपूर्ण प्रकरणाच्या मास्टरमाईंड संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.