Nashik Crime News | आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं विषारी औषध, घटनेने खळबळ

नाशिक : Nashik Crime News | कळवण तालुक्यात चक्क आमदाराकडून धमकावण्यात येत असल्याने काँग्रेस पदाधिकारी महिलेने विषारी औषध प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेच्या भावाने आमदार नितीन पवार यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे नुकतेच विधिमंडळ अधिवेशनात आमदार महोदयांनी ग्रामसेवकाविरुद्ध लक्षवेधी उपस्थित केली होती. त्या लक्षवेधीचा उल्लेखही संबंधित तक्रारदाराकडून करण्यात आला आहे.
कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार व त्यांच्या पत्नी जयश्री पवार ह्या कोणत्या ना कोणत्या कारणाने खोट्या तक्रारी करून ग्रामसेवक असलेल्या पतीस त्रास देतात. म्हणून काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या शीतल महाजन या महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कळवण येथे घडली आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या महिलेने तशी चिठ्ठी लिहून ठेवल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार नितीन पवार व जयश्री पवार यांच्या विरोधात काम केल्यामुळे शीतल महाजन यांच्या ग्रामसेवक पतीला खोट्या तक्रारी करून अटकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अनेकवेळा चौकशी होऊनही तक्रारीत तथ्य आढळलेले नाही. तरीही जाणीवपूर्वक त्रास सुरूच होता, असे महाजन यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.
नुकतेच विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार नितीन पाटील यांनी लक्षवेधी उपस्थित करत ग्रामसेवक रामराव महाजन यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. आमदार महोदयांकडून जाणीवपूर्वक होत असलेल्या याच त्रासाला कंटाळून शीतल महाजन यांनी विषारी औषध घेऊन स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शीतल महाजन यांचे बंधू योगेश गायकवाड यांनी केला आहे. दरम्यान या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.