Pune Traffic Police | पुणे : धुलवडीला 402 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई ! 386 वाहने जप्त, एकाच दिवसात 50 लाखांचा दंड

Drink And Drive

पुणे : Pune Traffic Police | होळी आणि धुलीवंदन साजरा करताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करु नये, यासाठी वाहतूक शाखेने विशेष मोहिम राबविण्यात आली. त्यात मद्यपान करुन वाहन चालवणार्‍या ४०२ तळीमारांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. एकूण ६ हजार ११८ केसेस करण्यात येऊन त्यांच्यावर ५० लाख ९४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे होळीचा सण आनंदी, सुरक्षित साजरा करता यावा, या करीता शहरातील बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी १४ मार्च रोजी विशेष मोहिम आखण्यात आली होती. त्यात ९० ठिकाणी नाकाबंद करण्यात आली़ तेथे वाहनांची तपासणी केली गेली.

शहरामधील एकूण ३७ वाहतूक विभाग व संबंधित पोलीस ठाण्याकडून लावण्यात आलेल्या नाकाबंदीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या बेशिस्त वाहनचालकांवर ट्रिपल सिट, राँग साईड, ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हच्या कारवाई अंतर्गत ३८६ वाहने जप्त करुन एकूण ६ हजार ११८ केसेस करण्यात आल्या. त्यांच्यावर एकूण ५० लाख ९४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

  • ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह – ४०२
  • ट्रिपल सिट – ९२१
  • राँग साईड – ८५२

एकूण केसेस – ६११८

एकूण दंडात्मक रक्कम – ५०९४००० रुपये