Pune Crime News | पुणे : ‘इधर धंदा करने से पहिले दस बार सोचना चाहिये था’; कामगाराला अंडाबुर्जी बनविण्याच्या पॅनने केली जबर मारहाण, जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : Pune Crime News | शेजारील हॉटेलमध्ये डोसा विक्रीचा सेटअप लावल्याने झालेल्या वादात तिघांनी डोसा कामगाराला अंडाबुर्जी बनविण्याचा पॅन डोक्यात घातला. लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याबाबत दुलारी देवी (वय ३८, रा. वाकडेवाडी बसस्टॉपजवळ, शिवाजीनगर) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नौशाद इक्बाल ऊर्फ नाना शेख (वय ४१, रा. सिंध सोसायटी, दिघी) आणि अवदेश बहादुर सिंग (वय ३३, रा. जलालपूर, उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे. ही घटना वाकडेवाडी येथील बस स्टँडच्या समोरील गरम चाय हॉटेलमध्ये १३ मार्च रोजी रात्री पावणे अकरा वाजता घडली. या घटनेत विनोद नंदु दिखाव (वय ५२) हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वाकडेवाडी येथील बसस्टँडसमोर न्यू गरम चाय नावाचे हॉटेल आहे. हॉटेलमध्ये चहा, व्हेज थाली व बिर्याणी विकली जाते. दुकानामध्ये तीन कामगार आहे. जेवढा पाहिजे तेवढा धंदा होत नसल्याने त्यांनी हॉटेलमध्ये नव्याने डोसा विक्रीचा सेटअपर लावून नवीन कामगार विनोद दिखाव यांना कामावर ठेवले होते.
त्यांच्या शेजारी नौशाद इक्बाल शेख यांचा स्टॉल आहे. १३ मार्च रोजी शेजारी असलेल्या नौशाद याने टपरीच्या बाहेर येऊन फिर्यादी यांना ऐकु येईल, अशा मोठ्या आवाजात बोलला की, ‘‘अगर सारा धंदा करोगी, तो हम क्या करेंगे, अगर इसको आज के आज नही निकाला तो मुझे दोन लोगो का मर्डर डालना पडेगा’’ असे म्हणून तो निघून गेला. त्यानंतर काही वेळाने अंडाबुर्जीचा व्यवसाय करणारे नौशाद शेख याचे कोणातरी सोबत वाद झाले होते. त्यावेळी त्यांचा कामगार वाद सोडविण्यासाठी गेला होता. त्यानंतर फिर्यादी यांच्या हॉटेलमधील सर्व सामान आवरुन ठेवत असताना नौशाद शेख हा हातात अंडा बुर्जी बनविण्याचे पॅन घेऊन आला. औदेशसिंग व इतराकडे लाकडी दांडके होते. त्यांनी विनोद दिखाव यांना बाहेर काढून ‘‘इधर धंदा करने से पहिले दस बार सोचना चाहिये था. तुझे अब छोडूंगा तो साले मुझे भीक मांग के खाना पडेगा,’’ असे म्हणत शेख याने हातातील अंडा बुर्जी बनविण्याचे लोखंडी पॅनने विनोद दिखाव यांच्या डोक्यात मारला. औदेशसिंग व इतरांनी त्यांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारुन जबर जखमी केले..
नौशाद शेख याने हातातील पॅन हवेत फिरवून ‘‘हमारे साथ जो पंगा करेगा, उनको जिंदा नही छोडेंगे,’’ असून त्याने दहशत पसरविली. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करीत आहेत.