Pankaja Munde On Dhananjay Munde | ‘धनंजय मुंडे यांना मंत्रिपदच द्यायला नको होतं…, मी संतोष देशमुखांच्या आईची माफी मागते’ – पंकजा मुंडे

मुंबई : Pankaja Munde On Dhananjay Munde | बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड घडणारे आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने, तसेच या हत्याकांडाचे थरारक असे क्रौर्य दर्शवणारी छायाचित्रे काल प्रसारित झाल्यानंतर मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. आता या राजीनाम्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. धनंजय मुंडे यांच्या भगिनी असलेल्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष देशमुखांच्या हत्येची छायाचित्रे आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ”संतोष देशमुख यांना मारण्याच्या संदर्भातले व्हिडिओ उघडण्याची हिंमत झाली नाही. ज्यांनी त्यांना एवढ्या अमानुषपणे मारून त्याचा व्हिडिओ केला आहे त्यांची अमानुष्यता पाहण्याची माझ्यात हिंमत नाही. देशमुखांचा हत्येनंतर मी पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले होते.
12 डिसेंबरला मी यावर केलेल्या भाषणात व्यक्त झालेली आहे. यामध्ये कोण आहे, काय नाही, हे तपास यंत्रणेलाच माहिती आहे. त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप मी करण्याचे कारण नाही. एवढे मात्र नक्की सांगते, ज्या मुलांनी ही हत्या केली त्यांच्यामुळे संपूर्ण राज्यातील समाजाचा काहीही दोष नसताना समाजाला मान खाली घालून गंभीरपणे वावरावे लागत आहे. इतकी निर्घृण हत्या झाली हे पाहून समाज आक्रोशात वावरत आहे. समाज आणि जात यावर बोलायची गरज नाही पण परिस्थितीच अशी आहे.
आता प्रत्येक गोष्ट जातीवर जाते. अमानुषपणे कोणाला संपवणार्याला कोणतीही जात नसते. त्याच्यावर निर्णय घेणार्या राज्यकर्त्याला जात नसली पाहिजे. जेव्हा या खूर्चीवर बसले तेव्हा मी शपथ घेतली आहे, आमदारकीची शपथ घेतली, कुठलाही ममत्व भाव न बाळगता कुणाविषयी कुठलाही आकस द्वेष न बाळगता काम करायला पाहिजे यावर मी ठाम आहे.
संतोष देशमुखांच्या निघृण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून त्यांच्या आईची क्षमा मागते. कारण, ज्या मुलांनी निघृण हत्या केलीय ते माझ्या पोटचे असते, पदरात असते तर त्यांना कडक शासन करा असेच म्हटले असते.
धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, त्याचे स्वागत व्हायला पाहिजे. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. या राजीनाम्यापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती. तर कदाचित पुढच्या गोष्टींना सामोरे जावे लागले नसते. राजीनामा घेणार्यांनी आधी घ्यायला हवा होता, धनंजयने पण आधी द्यायला हवा होता. सन्मानाचा मार्ग मिळाला असता.
जेव्हा आपण खूर्चीवर बसून विचार करतो तेव्हा राज्याचा प्रत्येकाचा सारखा विचार केला पाहिजे. त्या परिवाराच्या, जीवाच्या वेदनांपुढे काही मोठा निर्णय नाही. धनंजय मुंडेंनी घेतलेला निर्णय देर आये दुरुस्त आये असा आहे”, अशी रोखठोक प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.