Dhananjay Munde | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणात अडचणीत आलेले धनंजय मुंडे यांनी अखेर दिला मंत्रिपदाचा राजीनामा, 2 सहकार्‍यांमार्फत राजीनामा पाठवला !

मुंबई : Dhananjay Munde | बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) अडचणीत आलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज अखेर राजीनामा दिला आहे. आपले सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी यांच्या हस्ते मुंडेंनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पाठवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो स्वीकारला आहे.

धनंजय मुंडे यांना काल रात्रीच राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते, याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिली होती.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो काल समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचा लाट उसळली. अवघा महाराष्ट्र वाल्मिक कराड गँगचे क्रौर्यपाहून हादरला. यानंतर मोठ्या प्रमाणात जनआक्रोश पहायला मिळाला. धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेण्यास टाळाटाळ करणार्‍या महायुती सरकारवर लोकांनी आपला रोष व्यक्त करण्यास सुरूवात केली.

यानंतर रात्री उशीरा मुंबईत महायुतीमधील हालचालींना वेग आला होता. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. याच बैठकीत मुंडे यांनी राजीनामा देण्याचे ठरले. त्यानुसार आज धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा आपल्या सहाय्यकांच्या हस्ते सागर बंगल्यावर पाठवला.

9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून अपहारणानंतर ही हत्या झाली होती. या हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराड यांच्या गँगने ही हत्या केली. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा सहकारी आणि व्यावसायिक भागीदार असल्याचे नंतर समोर आले आहे.