Dhananjay Munde | धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विरोधक आक्रमक होऊ नयेत यासाठी भाजपाची खास रणनीती, अबु आझमींच्या वक्तव्याचा असा घेतला आधार

मुंबई : Dhananjay Munde | संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे काळीज पिळवटून टाकणारे फोटो काल प्रसारित झाल्यानंतर आज विरोधक सभागृहात रान पेटवणार हे स्पष्ट झाले होते. विधानसभेत याच मुद्द्यावरून चर्चा होणार हे माहित असल्याने नवीन रणनीती आखून अबु आझमी यांच्या वक्तव्यावरून भाजप आमदारांनी जोरदार भाषणबाजी सुरू केली आहे, आणि विरोधकांनी बोलण्याआधीच विधानसभा हायजॅक करण्याचा प्रयत्न केला.
राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झाले असून पहिल्या दिवसापासूनच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सभागृहात करण्यात येत आहे. त्यातच काल रात्री बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली.
यानंतर रात्री उशीरा या प्रकरणातील आरोपींचे निकटवर्तीय असलेले मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज धनंजय मुंडे यांच्या दोन सहायकांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामा स्वीकारल्याचे जाहीर केले.
दरम्यान, आज सभागृहात संतोष देशमुख खूनप्रकरणावर विरोधक आक्रमक होणार हे माहित असल्याने भाजपा आमदारांनी विरोधी आमदारांना या विषयावर चर्चाच करू न देण्यासाठी खास रणनीती आखल्याचे दिसून आले. काल समाजवादी पक्षाचे आमदार आबु आझमी यांनी औरंगाजेबाचे कौतुक करणारे वक्तव्य केले होते.
आझमींच्या या वक्तव्याचा आधार घेत सत्ताधारी आमदारांनी निषेधाची भाषणे सुरू केली आहेत. याद्वारे विरोधकांना संतोष देशमुख खूनप्रकरणावर चर्चा करण्यापासून रोखून धरण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी एका अर्थाने औरंगजेबाचा आधार घेत विरोधी आमदारांना आक्रमक होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
दरम्यान, अबु आझमी यांनी काल म्हटले होते की, मुघलांचा बादशहा औरंगजेब हा एक सहिष्णू राजा होता. त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती. औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे, असे आझमी यांनी म्हटले होते.