Swargate Rape Case | पुणे: स्वारगेट अत्याचार प्रकरणी फेक नरेटिव्ह, पिडीत तरुणीला बदनाम करण्याचे षडयंत्र; सत्यता जाणून घ्या

पुणे : Swargate Rape Case | स्वारगेट डेपोमध्ये मंगळवारी (दि.२५) पहाटेच्या वेळी २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेमुळे पुण्यासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली. याबाबत आरोपी दत्ता रामदास गाडेला (Datta Ramdas Gade) पोलिसांनी दोन दिवसात अटक केली होती. या अटकेसाठी पोलिसांनी १३ पथके तयार केली . ज्यामध्ये १०० पोलिसांचा समावेश होता. (Pune Crime News)

न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणावरून समाजमाध्यमात उलट- सुलट चर्चा सुरु आहेत. या अत्याचार प्रकरणी ‘फेक नरेटिव्ह’ पसरण्यात येत आहे. समाज माध्यमातुन स्वारगेट लैंगिक अत्याचार संदर्भात चुकीची चर्चा सुरु आहे. ज्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे दिसून येत आहे.

१) फेक नरेटिव्ह: आरोपी आणि पीडित यांची ओळख असल्याची चर्चा

सत्यताः आरोपी दत्ता गाडे आणि पीडित तरुणी यांचा कुठलाही संबंध नाही. पीडित तरुणी अनेकवेळा स्वारगेट येथून प्रवास करत असली तरी सुद्धा तिची आणि आरोपीची कुठलीच ओळख नसल्याचे तपासातून समोर आले आहे.

२) फेक नरेटिव्ह: आरोपी आणि पीडित यांचा एकमेकसंशी संपर्क असल्याचे म्हंटले जात आहे.

सत्यताः पीडित आणि आरोपीचे सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) तपासले असता दोघांमध्ये कुठलेही कॉल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पीडित आणि आरोपीच्या मोबाईलमध्ये एकमेकांचा संपर्क नंबर नाही. गेल्या ६ महिन्यांमध्ये दोघांमध्ये कुठलेही संभाषण नसल्याचे उघड झाले आहे.

३) फेक नरेटिव्ह : घटनेनंतर पीडित आणि आरोपी एकत्र आले असल्याची चर्चा

सत्यताः मंगळवारी घटना घडल्यानंतर पीडित आणि आरोपी यांचे लोकेशन हे हडपसर येथे आढळून आले असले तरी दोघांचे सेलआयडी हे वेगळे आहेत. आरोपी हा सोलापूर रस्त्याने शिरूरकडे पळून गेला तर पीडित तरुणी ही सासवड रस्त्याने गेली असल्याची माहिती आहे.

४) फेक नरेटिव्ह : पीडित आणि आरोपीमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची झाल्याची चर्चा

सत्यता: आत्तापर्यंत झालेल्या तपासात पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यात कुठलाही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांच्या बँक स्टेटमेंटची पडताळणी केल्यानंतर दोघांमध्ये कुठलेही ऑनलाईन व्यवहार नसल्याचे समोर आले आहे.