Eknath Shinde | एकनाथ शिंदे अजुनही नाराज? ऐन अधिवेशनात घेतला ‘हा’ निर्णय, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

मुंबई : Eknath Shinde | राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाची एक मोठी माहिती समोर आल्याने महायुती सरकारमध्ये धुसफूस असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. ऐन अधिवेशनाच्या काळात शिंदेंनी घेतलेल्या या निर्णयाची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
मुख्यमंत्रीपद, खातेवाटप, पालकमंत्र्यांची नियुक्ती यावरून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेतील नाराजीची चर्चा सुरूवातीपासूनच आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांवर चौकशी सुरू झाली आहे. तर, काही निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यांच्या मंत्र्यांच्याही निर्णयांना स्थगिती देण्यात येत आहे. यामुळे शिंदेसेनेवर दबाव आणला जात असल्याचे बोलले जात आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर येत आमच्यात सर्वकाही सुरळीत असल्याचे दर्शवले असले तरी आता ऐन अधिवेशन काळात एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे महायुती सरकारमधील प्रमुखांमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याच्या चर्चेला बळकटी प्राप्त झाली आहे.
एकनाथ शिंदे हे विधीमंडळ अधिवेशनाच्या कामकाजातून पूर्णपणे अलिप्त राहणार असल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील तिन्ही खात्या संदर्भातील विचारण्यात येणार्या प्रश्नाची जबाबदारी शिवसेनेच्या इतर मंत्र्यांकडे दिली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्या संदर्भातील प्रश्नांना उत्तरे देण्याची जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे देण्यात आली आहे. तर सार्वजनिक उपक्रम एमएसआरडीसीच्या संदर्भातील उत्तरांची जबाबदारी मंत्री दादा भुसे यांच्याकडे दिली आहे. तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी ही पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे दिली आहे. यावरून शिंदे हे अधिवेशनापासून अलिप्त राहणार असल्याची चर्चा रंगली आहे.