Santosh Deshmukh Murder Case | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराडच, खंडणीच्या वादातूनच खून, दोषारोपपत्रातून माहिती समोर

बीड : Santosh Deshmukh Murder Case | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय म्हणून समोर आलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) हाच या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात म्हटले आहे. यामुळे आता कराडच्या गळ्याभोवती फास आवळला जाणार, हे निश्चित झाले आहे. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

पोलिसांनी हत्येच्या ऐंशी दिवसांनंतर न्यायालयात दाखल केलेल्या आरोप पत्रात वाल्मिक कराडचा मुख्य आरोपी म्हणून उल्लेख केला आहे. तर विष्णू साठे दोन नंबरचा आरोपी आहे. संतोष देशमुख यांची हत्या ही पूर्णतः खंडणीच्या वादातून झाल्याचे आरोपपत्रातून स्पष्ट म्हटले आहे.

29 नोव्हेंबर रोजी सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर 6 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे यांच्याशी वाद झाला होता. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्ध हे पुरावे मिळाले आहेत.

खंडणी, अपहरण आणि खून अशा तिन्ही घटनांचा एकत्रित उल्लेख आरोप पत्रात पोलिसांनी केला आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओसुद्धा सीआयडीच्या हाती लागला आहे.

सुरूवातीला पोलिसांनी खंडणी आणि खून असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून वाल्मिक कराडला केवळ खंडणीच्याच गुन्ह्यातच घेतले होते. यानंतर कराडला वाचविण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचा आरोप झाला होता.

मात्र, आता पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार वाल्मिक कराडलाच मुख्य आरोपी करण्यात आले आहे. वाल्मिक कराडच प्रमुख सूत्रधार ठरल्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्याही अडचणीत वाढ होणार आहे. कारण दोघांचे निकटचे तसेच आर्थिक संबंध असल्याचे पुरावे समोर आले आहेत.