Mallika Dhasal | नामदेव ढसाळांच्या पत्नीचा संताप, म्हणाल्या – ”माथेफिरू सेन्सॉर बोर्डावर कारवाई करा…त्यांना”

मुंबई : Mallika Dhasal | कवी आणि दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या कविता ‘चल हल्ला बोल’ या दलित चळवळीवर आधारित चित्रपटात वापरल्या आहेत. हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे आल्यानंतर बोर्डाच्या सदस्यांनी या कवितांवर आक्षेप घेतला. यावर ढसाळांच्या कविता असल्याचे सांगितल्यावर ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच आता ढसाळांच्या पत्नीने देखील संताप व्यक्त करत माथेफिरू सेन्सॉरवर कारवाईची मागणी केली आहे.

नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका ढसाळ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सेन्सॉर बोर्डाला सुनावताना त्या म्हणाल्या, थोर पुरुषांचा अपमान टाळण्यासाठी मराठी सिनेमा सेन्सॉर बोर्डवर योग्य व्यक्ती असाव्यात, ज्यांना मराठी भाषेचा सन्मान असेल, माहिती असेल.

‘चल हल्ला बोल’ चित्रपटाविषयी खुलासा करताना मल्लिका ढसाळ म्हणाल्या, दिग्दर्शकाने कोणतीही परवानगी न घेता नामदेव ढसाळ यांच्या कविता वापरल्या आहेत. इतकी भयंकर वेळ माझ्यावर आली आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. हा मराठीचा अपमान आहे. मराठीचा झेंडा जगात लावला आहे, तो माणूस कोण असे कसे विचारू शकतात. त्या माणसाचे तातडीने निलंबन करावे.

आपला संताप व्यक्त करताना श्रीमती ढसाळ म्हणाल्या, ही अकलेची दिवाळखोरी आहे. गैरफायदा घेण्याचा कोणाला अधिकार नाही. हल्ला बोल सिनेमा माझ्या परवानगीशिवाय केला आहे. यामध्ये नामदेव ढसाळ यांच्या कविता वापरल्या आहेत. मी कायदेशीर कारवाई करणार आहे.