Gaja Marne Gang | गजा मारणेच्या दोन आलिशान फॉर्च्युनर गाड्या गुन्हे शाखेने केल्या जप्त; आणखी काही ठिकाणचे फुटेज घेतले ताब्यात (Video)

पुणे : Gaja Marne Gang | आय टी इंजिनिअरला मारहाण करुन खुनाचा प्रयत्न करणार्‍या कुख्यात गुंड गजा मारणे याच्याकडील दोन फॉर्च्युनर गाड्या गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री जप्त केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात दोन दुचाकीसह दोन कार अशी चार वाहने जप्त करण्यात आली आहे. (Pune Crime Branch)

शिवजयंतीच्या दिवशी आपल्या दुचाकीवरुन जाणार्‍या देवेंद्र जोग यांना गजा मारणे टोळीतील तिघांनी कोथरुडमधील भेलकेनगर चौकात मारहाण केली होती. मारहाण करणार्‍या चौघांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यावेळी हे सराईत गुंड असून ते गजा मारणे टोळीतील असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन गजा मारणे याला अटक केली. न्यायालयाने त्याला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी सांगितले की, गजा मारणे याच्या टोळीने जोग यांना मारहाण केली. त्यावेळचे फुटेजची तपासणी करण्यात आली. परिसरातील दुकानदार, टपरीचालक अशा अनेकांचे जबाब घेतले. त्यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. त्यावेळी गजा मारणे याच्या दोन फॉर्च्युनर गाड्या येथे असल्याने पोलिसांनी या गाड्या जप्त केल्या आहेत. आणखी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून त्याच्या तपासणीतून यात आणखी कोण कोण लोक होते, याचा तपास केला जात आहे.
जोग यांना मारहाण करणार्‍या तिघांना कोथरुड पोलिसांनी अटक केली होती. त्यांचा साथीदार बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार याचा शोध अद्याप लागला नसून तो अजूनही फरार आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच रुपेश मारणे याचाही शोध घेतला जात आहे.