Dombivli Crime News | ‘तुझ्यासोबत लग्न करेन’, प्रियकरानं दिलं आश्वासन मात्र भलतीसोबतच केलं लग्न, त्रास असह्य झाल्याने तरुणीनं स्वतःला संपवलं

डोंबिवली : Dombivli Crime News | प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांकडून होणारा त्रास असह्य झाल्याने तरूणीने तिची सारी व्यथा सोशल मीडियावर मांडून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुमन मच्छिंद्र शेंडगे (वय- ३२) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही धक्कादायक घटना टिटवाळ्यात घडली. (Suicide Case)

अधिक माहितीनुसार, सुमन आणि सचिन शास्त्री यांचे गेल्या १० वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. सचिन शास्त्री यांनी सुमनला तुझ्या सोबत लग्न करेन, असे आश्वासन देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. परंतु त्याने सुमनच्या नकळत पाच वर्षांपूर्वीच गायत्री नामक तरूणीशी विवाह केला. पती सचिन आणि सुमन या दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती गायत्रीला समजली. त्यानंतर सचिन आणि कुटुंबियांकडून सुमनला त्रास देण्यास सुरूवात झाली.

नेहमी फोन करून, तसेच प्रत्यक्ष समोर भेटून सचिन आणि त्याचे कुटुंबीय सुमनला वारंवार टार्गेट करत होते. सातत्याने होणाऱ्या जाचाला कंटाळलेली सुमन मानसिकदृष्ट्या खालावून गेली होती. शेवटी तिने स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. राहत्या घरात सुमनचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत छताला लटकलेला आढळून आला.

सुमनला आत्महत्येसाठी सचिन आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. कल्याण तालुका पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सुमनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. जोपर्यंत आरोपीवर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेणार नसल्याचा इशारा नातेवाईकांनी दिला आहे. दरम्यान पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती आहे.