Mumbai Crime News | सासूच्या कट-कारस्थानांमुळे संसार मोडल्याचा डोक्यात राग, हातोडीने मारून सासूला पेटवून दिलं, त्यानंतर जावयाने स्वतःही पेटवून घेत संपवलं जीवन

मुंबई : Mumbai Crime News | सासूच्या कट-कारस्थानांमुळे संसार मोडल्याच्या रागातून जावयाने सासूला पेटवून हत्या केल्याची तसेच त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बाबी दाजी उसरे (वय-७२) असे मृत सासूचे नाव आहे. तर कृष्णा अटनकर (वय-५९) असे मृत जावयाचे नाव आहे. मुलुंड परिसरात ही घटना घडली आहे. (Suicdie-Murder Case)

अधिक माहितीनुसार, कृष्णा अटनकर आणि त्यांच्या पत्नीची अनेकदा भांडणे व्हायची. याच कौटुंबिक कलहाला कंटाळून कृष्णा अटनकर यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. या दोघांचा १० वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. यासाठी आपली सासू बाबी उसरे कारणीभूत असल्याचा राग कृष्णा यांच्या मनात होता. संसार मोडल्यानंतर कृष्णाची पत्नी मुलुंड येथील आपल्या आईच्या घरी राहायला गेली होती. ती आपल्या २० वर्षांच्या मुलासोबत तिकडे राहत होती. कृष्णा अनेकदा त्यांना भेटायला मुलुंडला जायचा. यावरुन कृष्णा आणि बाबी उसरे यांच्यात वाद झाला होता.

तो सोमवारी सकाळी ८ वाजता बाबी उसरे यांच्या घरी गेला होता. बाबी उसरे यांना रुग्णालयात तपासणीसाठी जायचे असल्याने कृष्णा त्यांना आपल्या मिनी टेम्पोतून घेऊन निघाला होता. कृष्णाने घरापासून काही अंतरावर टेम्पो पार्क केला होता. नाणेपाडा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कृष्णा टेम्पोच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. कृष्णाने बाबी उसरे यांना टेम्पोच्या मागच्या भागात बसवले होते.

बाबी उसरे टेम्पोच्या मागच्या भागात बसल्यानंतर कृष्णाने टेम्पोचा दरवाजा आतून लावून घेतला. त्यानंतर कृष्णाने अचानक हातोडी काढून सासूच्या डोक्यावर वार केले. त्यामुळे सासू बेशुद्ध पडल्याची संधी साधून कृष्णा अटनकर याने सासूच्या अंगावर पेट्रोल आणि थिनर ओतून पेटवून दिले. त्यानंतर कृष्णाने स्वत:च्या अंगावरही पेट्रोल आणि थिनर ओतून घेत आत्महत्या केली.

या परिसरातून जाणाऱ्या एका व्यक्तीला टेम्पोतून आगीच्या ज्वाला बाहेर निघत असल्याचे दिसले. त्याने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवून टेम्पोचे दार उघडले असता आतमध्ये बाबी व कृष्णा यांचे मृतदेह त्याचबरोबर हातोडी, रॉकेलची बाटली, लायटर असे साहित्य आढळले. दरम्यान त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हत्येचा प्रकार उघडकीस आला.