Shivaji Nagar Pune Crime News | ज्येष्ठ महिलेचे मंगळसुत्र हिसकावून पळून जाणाऱ्या चोरट्यास नागरिकांनी पाठलाग करुन पकडले

गुडघ्याचे ऑपरेशन झाले असतानाही ७० वर्षांच्या आजीने पाठलाग करुन आरडा ओरडा केल्याने लोक पुढे सरसावले

पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | शिवाजीनगर येथील कॅनॉल रोडवर सामसुम असते. अशा वेळी एक ७० वर्षाची ज्येष्ठ नागरिक महिला पायी जात होती. तेव्हा एक चोरट्याने ही संधी साधत तिच्या गळ्यातील १ लाख रुपयांचे मंगळसुत्र हिसकावले़ गुडघ्याचे ऑपरेशन झाले असतानाही तिने चोरट्याचा पाठलाग करत आरडाओरडा केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून लोक मदतीला धावले. त्यांनी काही अंतर पाठलाग करुन या चोरट्याला पकडले. (Arrest In Robbery Case)

शंकर महादु मोहन (वय ४२, रा. जुनी वडारवाडी, सध्या रा. सुतारदरा, कोथरुड) असे या चोरट्याचे नाव आहे. याबाबत वडारवाडी येथे राहणार्‍या एका ७० वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कॅनॉल रोडवर २३ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता घडली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शिरोळे बंगला येथील घरकाम करुन पायी कॅनॉल रोडने जात होत्या. त्यावेळी या एकेरी वाहतूकीच्या रोडवर एक चोरटा त्यांच्या पाठीमागून आला. त्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून घेतले. तो ज्ञानेश्वर पादुका चौकाच्या दिशेने पळत जाऊ लागला. फिर्यादी यांचे गुडद्याचे ऑपरेशन झाले असल्यामुळे त्यांना जास्त वेगाने पळता येत नव्हते. त्यांनी मदतीकरीता आरडाओरडा करत चोरट्याचा पाठलाग करत त्या ज्ञानेश्वर पादुका चौकाच्या दिशेन गेल्या. त्यांचा आवाज ऐकून लोकांनी त्या चोरट्याचा पाठलाग सुरु केला. चोरटा ज्ञानेश्वर पादुका चौक ओलांडून शिवाजीनगर पोलीस लाईनच्या दिशेने पळू लागला. तेव्हा लोकांनी त्याचा पाठलाग करुन श्रीनाथ प्लाझा समोर त्याला पकडले. पाठोपाठ फिर्यादी तेथे पोहचल्या. त्याच्याकडे फिर्यादी यांचे मंगळसुत्र होते. पोलिसही तातडीने तेथे आले. या घटनेमुळे फिर्यादी या घाबरुन गेल्याने त्यांना चक्कर आली. शिवाजीनगर पोलिसांनी चोरट्याला अटक करुन त्याच्याकडील एक लाख रुपयांचे मंगळसुत्र जप्त केले आहे.