Pune Crime News | स्पीडब्रेकरवरुन वेगाने बस नेल्याने प्रवाशांचा पाठीचा मणका फ्रॅक्चर; सातारा रोडवरील अरण्येश्वर येथील पहाटेची घटना, एसटी बसचालका विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | पहाटेच्या वेळी रस्ता मोकळा मिळला तरी नेहमीचा रस्ता नसल्याने वाहन वेगाने चालवू नये, कारण रस्त्यांमध्ये अनेक अडथळे असतात. पण हे एस टी बसचालकाने लक्षात न घेतल्याचा फटका एका ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला बसला. अरण्येश्वर येथील स्पीडब्रेकरवरुन वेगाने एस टी बस नेल्याने त्यामुळे बस उडून प्रवाशाचे डोके लोखंडी रॅकला धडकून लोखंडी बारला कंबर आदळल्याने त्यात कमरेस व मणक्यास दुखापत झाली. एक्स रे काढल्यावर पाठीचा मणका फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले.

याबाबत राजाराम दत्तु मगदुम (वय ७४, रा. पिंपळगाव, ता. गारगोटी, जि. कोल्हापूर) यांनी सहकारनगर पोलिसांकडे (Sahakar Nagar Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी एस टी बसचालक पंकज शामराव मसराम (वय ३३, रा. मलकापूर, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अरण्येश्वर येथील पीएमटी बसस्टॉपसमोरील स्पीडब्रेकरवर २४ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीन वाजता घडली. मगदुम यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हॉस्पिटलमधून त्यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे विजया एकादशी निमित्त आळंदी येथे देवदर्शनासाठी आले होते. देवदर्शन करुन ते पुन्हा कोल्हापूरकडे एस टी बसने जात होते. पहाटेच्या वेळी रस्त्यावर गर्दी नसल्याने चालक वेगाने बस घेऊन जात होता. अरण्येश्वर येथे साडेतीन वाजण्याच्या सुमारास बस आली. चालकाच्या लक्षात तेथील स्पीडब्रेकर न आल्याने बस वेगाने त्यावरुन उडाली. त्यामुळे मगदुम हे जागेवरुन हवेत उडून त्यांचे डोके एस टी बसमधील साहित्य ठेवण्याचे लोखंडी रॅकला धडकून परत सीटवर न पडता लोखंडी बारवर त्यांची कंबर आदळल्याने त्यांच्या कमरेस व मणक्यास दुखापत झाली. त्यांच्या आवाजामुळे चालकाने बस थांबविली व जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेले. परंतु, तेथे उपचाराचा खर्च जास्त असल्याने रुग्णवाहिकेतून त्यांना ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. कमरेचा एक्स रे काढल्यावर पाठीचा मणका फ्रॅक्चर झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्यानंतर बसचालक हा विचारपूस करण्यासाठी ससून रुग्णालयात आला होता. सहकारनगर पोलिसांनी एस टी बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे.