Dhule Accident News | मामाला भेटण्यासाठी जाताना काळाचा घाला, भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, भीषण अपघातात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

धुळे : Dhule Accident News | मामाला भेटण्यासाठी जात असताना भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. आत्तरसिंग शांत्या पावरा (वय-२५, गुजर खुर्दे, ता- शिरपूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सांगवी परिसरात पेट्रोल पंपाजवळ घडली. या प्रकरणी वाहन चालकावर शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, आत्तरसिंग पावरा हा मामेभाऊ प्रदीप (वय-१३) याच्यासोबत रविवार (दि.२३) सकाळी दुचाकीने मध्य प्रदेशातील मोजली (ता-सेंधवा) येथे मामाच्या गावी जात होता. याच दरम्यान सांगवी महामार्गावर शिरपूरकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने आत्तरसिंगच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील दोघेजण फेकले गेले. ट्रकने दिलेल्या धडकेत आत्तरसिंगच्या डोक्याला गंभीर मार लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

तर सोबत असलेला प्रदीप हा रस्त्याच्या कडेला पडल्याने जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील वाहन चालक, महामार्ग पोलिस व तालुका पोलिसांसह ग्रामस्थांनी महामार्ग रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच आत्तरसिंगचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हा अपघात घडल्यानंतर महामार्गावर वर्दळ जमली होती. याचाच फायदा घेत ट्रक चालक अपघात स्थळावर न थांबता ट्रक सोडून फरार झाला. दरम्यान शिरपूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतर अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेऊन याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.