Police constable dies in road accident | ॲक्टिव्हा आणि भाजीचा टेम्पो यांच्यात भीषण अपघात, एका पोलिसाचा जागीच मृत्यू तर महिला पोलीस गंभीर जखमी

सिंधुदुर्ग : Police constable dies in road accident | ॲक्टिव्हा आणि भाजीचा टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे. कृष्णा मनोहर ठोंबरे (मूळ गाव-बोडका, जि-छत्रपती संभाजीनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. ते रत्नागिरी पोलीस ठाण्यात पोलीस म्ह्णून कार्यरत होते. तर त्यांच्यासोबत असलेल्या रत्नागिरी महिला पोलिस आरती अमर चौगुले (वय-२१, मूळ रा-बिद्री कागल, जि-कोल्हापूर) या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात खारेपाटण – गगनबावडा मार्गावर तिरवडे येथे रविवार (दि.२३) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडला.
अधिक माहितीनुसार, गगनबावड्याहून भाजीचा टेम्पो घेऊन टेम्पोचालक कादर ओमर पाटणकर (वय-४८, रा. कातळी, ता. गगनबावडा) हा उंबर्डेला येत होता. तर मोटारसायकलस्वार ठोंबरे हे ॲक्टिव्हा मोटारसायकल घेऊन त्यांची मानलेली बहीण आरती चौगुले यांच्या घरी (बिद्री-कागल, जि. कोल्हापूर) येथे कार्यक्रमाला जाण्यासाठी पहाटे रत्नागिरीहून कोल्हापूरकडे जात होते.
दरम्यान, रविवारी सकाळी सर्वत्र दाट धुके पडले होते. धुक्यात अंदाज न आल्यामुळे तिरवडे येथील सर्व्हिस सेंटरजवळ असलेल्या वळणावर टेम्पो व ॲक्टिव्हा यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात ठोंबरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णवाहिका बोलावून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच कृष्णा ठोंबरे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर गंभीर जखमी आरती चौगुले यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक माधुरी अडुळकर, हवालदार आ.बी. पाटील, राहुल तळसकर, अजय बिलपे, राजू येळगे, भगीरथ मोवळे, पुंडलिक वानोळे, हरिभाऊ जायभाय आदी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मयत कृष्णा ठोंबरे हे २०२३ साली रत्नागिरी पोलिस म्हणून सेवेत दाखल झाले होते. मयत कृष्णा ठोंबरे यांच्या पश्चात आई- वडील व विवाहित बहीण असा परिवार आहे.