Mumbai Crime News | ओव्हरटेक करण्यावरूनचा वाद टोकाला गेला, हेल्मेटने वार करत हत्या, आरोपी अटकेत

मुंबई : Mumbai Crime News | ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या भांडणात हेल्मेटने डोक्यावर वार करत एकाची हत्या करण्यात आली होती. आयटी प्रोफेशनल शिवकुमार रोशनलाल शर्मा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर मारहाण करणारे आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला होता. (Murder Case)
शिवकुमार शर्मा यांना मारहाण करत्यावेळी पकडून ठेवणाऱ्या रेहान शेखला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, शिवकुमार यांच्या डोक्यात वारंवार हेल्मेट मारणारा मुख्य आरोप फैझान शेख हा फरार होता. मात्र अखेर सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून नवी मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी फैझान शेख याला बांद्रा येथून अटक केली आहे.
अधिक माहितीनुसार, ३ फेब्रुवारी रात्री खारघर परिसरातील बेलपाडा ते उत्सव चौक या दरम्यान दोन दुचाकीस्वारांचे भांडण झाले. सतत ओव्हरटेक करणे, तसेच हुलकावणी देणे या क्षुल्लक कारणाने त्यांच्यात वाद झाला. यानंतर या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले.
यावेळी ओव्हरटेक करणाऱ्या दोन तरुणांनी शिवकुमार शर्मा यांच्या डोक्यात वारंवार हेल्मेटने प्रहार केले. यामुळे शिवकुमार हे गंभीर जखमी झाले. याच जखमी अवस्थेत स्वतः दुचाकी चालवत ते खारघर पोलीस स्टेशनला पोहोचले.खारघर पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर शिवकुमार यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला.
यानंतर पोलिसांनीही त्यांची तक्रार लिहून घेतली. तक्रार लिहिण्याच्या अखेरच्या क्षणी शिवकुमार शर्मा हे बेशुद्ध झाले. यावेळी पोलिसांनी शिवकुमार शर्मा यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी शिवकुमार शर्मा यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
दरम्यान या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने फैझान शेखला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपींच्या चौकशीतूनच शिवकुमार शर्मा यांच्या हत्येचा उलगडा होणार असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.