Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case | सुरेश धस पुन्हा मस्साजोगमध्ये दाखल, मृत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेतली भेट, म्हणाले – ‘आरोपींचे मित्र असलेल्या पोलिसांना सहआरोपी करा’

Suresh-Dhas

बीड : Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख खूनप्रकरणातील आरोपींशी असलेल्या निकटच्या संबंधामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर टीका होत होती. मनोज जरांगे, अंजली दमानियांसह विरोधी पक्षांनीही धस यांना लक्ष्य केले होते. मात्र, आज सुरेश धस यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली, यावेळी धस आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांमध्ये पुन्हा सुसंवाद झाल्याचे दिसून आले. यावेळी धस यांनी देशमुख खूनप्रकरणावर महत्वाचे भाष्य केले.

सरपंच संतोष देशमुख खूनप्रकरणात अजूनही सर्वच तपास यंत्रणा वेळकाढूपणा करत असून तपास जवळपास रखडल्याचे दिसत आहे. दोन महिने झाले तरी आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. यामुळे मस्साजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणात आहेत. याबाबत ग्रामस्थांची आणि देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग गावाल भेट देऊन चर्चा केली.

कृष्णा आंधळेला अटक करा

यावेळी पत्रकारांशी बोलताना सुरेश धस म्हणाले, आरोपी तारखेला आल्यावर मोठमोठाले बूट घातलेले, चित्रविचित्र दिसणारे लोक कसे येतात. आरोपींचे मनोबल वाढवण्यासाठी ते येतात. म्हणूनच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करणे आवश्यक आहे. कृष्णा आंधळे हा शातीर आहे, त्याला तात्काळ अटक केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

वायभासे पती-पत्नीला आरोपी करा

सुरेश धस यांनी म्हटले की, केजमधील काही पोलीस कर्मचार्‍यांना आरोपी करावे. डॉ. संभाजी वायभासे आणि त्यांच्या पत्नी यांनी आरोपींना पैसे पाठवले आहेत, त्यांना सहआरोपी करावे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे काही पोलीस कर्मचारी मित्र आहेत, त्यांना सहआरोपी करा. तसेच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आहे.

पीएसआय राजेश पाटीलला आरोपी करा

धस यांनी पत्रकारांना सांगितले की, चार्जशीट दाखल करण्यापूर्वी ग्रामस्थांनी 8 मागण्या केल्या असून संतोष देशमुख यांचे पार्थिव असलेली गाडी पीएसआय राजेश पाटील यांनी कळंबकडे वळवली होती, पण ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर गाडी परत वळवली. त्यामुळे राजेश पाटील याला आरोपी केले पाहिजे.

बिक्कडने आरोपींना मदत केली

त्याचबरोबर नितीन बिक्कड याने आरोपींना पळून जाण्यास मदत केली आहे, त्याला आरोपी केले पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. आत्तापर्यंत हा आरोपी आत जायला हवा होता, याची पण चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी धस यांनी केली.

सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांना कळवणार

संतोष देशमुख खून प्रकरणातील तपासाची माहिती देताना सुरेश धस म्हणाले की, आत्तापर्यंत 9 आरोपी हे 302 मध्ये आले आहेत. 10 वा आरोपी अजून त्यात नाही. त्याचा रोल खंडणी आणि इतर प्रकरणात आहे. वाल्मिक कराडसह इतर 9 लोक हे 302 मध्ये आले आहेत. उपोषणाला बसू नका असे म्हणणार नाही. पण या आपल्या सर्व मागण्या मी मुख्यमंत्री यांच्या कानावर घालणार आहे, असे धस म्हणाले.

कुमावत यांना अ‍ॅडशनल एसपी करा

आरोपीला मदत करणार्‍यांची जेल प्रशासनाकडून स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. मी उद्या नागपूर किंवा मुंबईत मुख्यमंत्री यांची भेट घेणार. या मागण्यांची पूर्तता झाली तर 25 तारखेला मस्साजोगकरांना आंदोलनाची गरज राहणार नाही. अ‍ॅडिशनल एसपी म्हणून पंकज कुमावत यांना बीडला आणावे अशी मागणी मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार आहे, अशीही माहिती धस यांनी दिली.