Pune Crime News | पुणे : विनापरवाना अफूची बेकायदेशीरपणे शेती ! कांदा व लसणाच्या शेतात केली होती लागवड, 27 लाखांचा माल हस्तगत

पुणे : Pune Crime News | वालचंदनगर येथील व्हावी गावात विनापरवाना अफूची बेकायदेशीरपणे लागवड केल्याचे आढळून आले. ही अफूची लागवड दिसून येऊ नये, म्हणून या करीता शेतात कांदा व लसून पिकांची लागवड केली होती. चहुबाजूने मका पिकाचे उत्पादन घेण्यात आले होते. पोलिसांनी २७ लाख ५६ हजार ४६० रुपये किंमतीची सुमारे ८८३ किलोग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करुन तिघांना ताब्यात घेतले आहे.

अंमली पदार्थ वनस्पतींची बेकायदेशीर विनापरवाना लागवड करुन उत्पादन करुन विक्री केल्यास कमी कालावधीत झटपट पैसा मिळतो, असे वाटल्याने अनेक जण कायद्याचा भंग करुन शेतीच्या नावाखाली शेतात अफू, गांजासारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणार्‍या वनस्पतीची विनापरवाना लागवड करुन उत्पादन घेत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी अशांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी गोपनीय माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

गुन्हे शाखेचे पथक वालचंदनगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना २१ फेबु्वारी रोजी पोलीस हवालदार स्वप्निल अहिवळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात विना परवाना अफूची लागवड करण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस पथकाने उपविगीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या परवानगीने संशयितांच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यात रतन कुंडलिक मारकडे (वय ५०), बाळु बाबुराव जाधव (वय ५४, दोघे रा. न्हावी, ता. इंदापूर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या शेतामध्ये कांदा व लसूण पिकामध्ये अफूची लागवड केल्याचे दिसून आले. त्याच परिसरातील कल्याण बाबुराव जाधव (वय ६५, रा. न्हावी, ता. इंदापूर) याच्या शेतातही अफूची लागवड केल्याचे आढळून आले. अफूची लागवड दिसून येऊ नये, म्हणून शेतात कांदा व लसूण पिकांची लागवड करुन चहुबाजूने मकाा पिकाचे उत्पादन घेण्यात आलेले होते. या करवाईमध्ये २७ लाख ५६ हजार ४६० रुपयांची सुमारे ८८३ किलोग्रॅम वजनाची बोंडासह अफची झाडे हस्तगत करण्यात आली आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, राहुल गावडे, पोलीस अंमलदार स्वप्निल अहिवळे, बाळासाहेब कारंडे, अभिजित एकशिंगे, अजय घुले, ईश्वर जाधव, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, योगेश नागरगोजे, धीरज जाधव, दगडु वीरकर, आसिफ शेख, रामदास बाबर, बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, महेश बनकर, अतुल डेरे, मंगेश थिगळे, विभीष सस्तुरे, वालचंदन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विजय तेळकीकर, पोलीस अंमलदार रवींद्र पाटमास, बापू मोहिते, गुलाब पाटील, शरद पोफळे, विक्रमसिंह जाधव, अभिजित कळसकर, गणेश बनकर, बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार स्मिता गायकवाड, मेघा शिंदे यांनी केली आहे.