Operation Tiger in Pune | पुण्यात ‘ऑपरेशन टायगर’, आता एकनाथ शिंदेंचा मोर्चा काँग्रेसकडे, दोन नेत्यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट

पुणे : Operation Tiger in Pune | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे. या मोहिमेला ऑपरेशन टायगर नाव दिले असून या अंतर्गत काही मोठे नेते शिंदेसेनेत गेल्याने ठाकरेंना जोरदार धक्के बसले आहेत. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या मोर्चा काँग्रेसकडे वळवला आहे. आता पुण्यातील एका मोठ्या काँग्रेस नेत्याला शिंदेसेनेने गळाला लावले आहे. दुसरीकडे या नेत्याचे गळ्यात भगवा घातलेले व्हॉट्सअप स्टेटस सध्या चर्चेत आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आपला मोर्चा पुण्याकडे वळवला असून काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शिवसेनेचे मोठे नेते मंत्री उदय सामंत आणि पुण्यातील काँग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली आहे. या भेटीनंतर धंगेकर हे शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
रवींद्र धंगेकर हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा असतानाच आता या चर्चेला दुजोरा देणारे धंगेकर यांचे व्हॉट्सअप स्टेटस समोर आले आहे. या स्टेट्समध्ये रवींद्र धंगेकर यांचा गळ्यात भगवा गमछा परिधान केलेला फोटो आहे. तसेच ‘तेरे क़दमों के तले मिट्टी भी सोना बन गयी, जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी. तू वाली है तू महेरमन है निगहमान है तू ही’ हे गाणे सोबत जोडले आहे. यावरून धंगेकर काँग्रेस सोडणार असल्याचे जवळपास पक्के मानले जात आहे.
मागील काही दिवसांपासून धंगेकर हे काँग्रेसवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. कारण, आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने काही नेत्यांना विभागनिहाय जबाबदारी दिली आहे. यामध्ये धंगेकर यांचे नाव नाही. यावरून धंगेकर नाराज असल्याचे वृत्त आहे. धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने तसेच काँग्रेसला काहीतरी कुणकुण लागल्यानेच काँग्रेसने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मात्र, यावर धंगेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
रवींद्र धंगेकर यांनी म्हटले की, मला डावलण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्यावर काहीतरी वेगळी जबाबदारी देणार असतील. त्यामुळे माझे नाव बाजूला ठेवला असेल. एकनाथ शिंदे यांना वैयक्तिक कामासाठी भेटलो. मी आजही सांगतो आणि उद्याही सांगेल. परवा अजित पवारांना देखील मी भेटलो.
ते पुढे म्हणाले, मी निरीक्षक म्हणून कधीच काम करत नाही मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. निरीक्षक म्हणून पक्षाचे वरिष्ठ लीडर काम करत असतात. पक्षाला अहवाल देण्याइतका मी मोठा नाही. कार्यकर्ता म्हणून माझ्यावरची जबाबदारी देतील ते मी पार पाडेन. मला योग्यवेळी पक्ष योग्य जबाबदारी देईल, असे धंगेकर म्हणाले. दरम्यान, भगवा गमछा घातलेले धंगेकर यांच्या व्हॉट्सअप स्टेट्सची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.