Kolhapur Crime News | पोलिसाची 3 वर्षांची मुलगी बसस्थानकावर हरवली, महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या जागरूकतेमुळे सुखरूप, कुटुंबीय पोलीस ठाण्यात येताच सुखद धक्का

कोल्हापूर : Kolhapur Crime News | तीन वर्षांची बालिका बसस्थानकावर कुटुंबीयांपासून दुरावली. मात्र बसस्थानकावरील महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या जागरूकतेमुळे बालिका सुखरूप पोलीस ठाण्यात पोहोचली. त्यानंतर कुटुंबियांना बालिका मिळाल्यानंतर सर्वानाच सुखद धक्का बसला.
अधिक माहितीनुसार, जयसिंगपूर बसस्थानकात पोलिस कर्मचारी शिवराज बसवराज बल्लोळी (रा-विजापूर, कर्नाटक) हे शुक्रवारी (दि.२१) दुपारी साडेबाराच्या सुमारास जयसिंगपूरहून विजापूरकडे जात होते. जयसिंगपूर बसस्थानकात विजापूर मार्गावर जाणाऱ्या बसमध्ये सर्व कुटुंबीय बसले.
बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने तीन वर्षांच्या आराध्या बल्लोळीला आईने किंवा आजीने घेतले असल्याचा समज शिवराज बल्लोळी यांचा झाला. तर दुसरीकडे आराध्याला शिवराज यांनी घेतल्याचा समज आई व आजीला झाला. त्यामुळे जयसिंगपूर बसस्थानकात आराध्याला न घेताच हे कुटुंबीय मिरज बसस्थानकात पोहोचले.
मिरज बसस्थानकात प्रवासी कमी झाल्यानंतर सर्व बल्लोळी कुटुंबीय एकत्रित सीटवर बसण्यासाठी जागा धरत असताना आराध्या तिघांकडेही नसल्याचे लक्षात आले. इकडे तीन वर्षांची आराध्या ही रडत सैरभैर अवस्थेत फिरत होती. अशावेळी महाविद्यालयीन विद्यार्थिनी स्नेहा विजय आंबी व प्राची दयानंद आंबी (दोघी रा. नांदणी), श्रेया रुपेश कांबळे (रा-हरोली) यांच्या ती हरवली असल्याचे लक्षात आले. त्यांनी तिला घेऊन थेट जयसिंगपूर पोलिस ठाणे गाठले.
पोलिस निरिक्षक सत्यवान हाके व पोलिस कर्मचारी रुपेश कोळी यांच्या ताब्यात देऊन घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, बल्लोळी कुटुंबीय रडत आणि भयभीत अवस्थेत पुन्हा जयसिंगपूर बसस्थानकात आले. यावेळी वाहतूक नियंत्रकांनी त्यांना पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. कुटुंबीय भयभीत अवस्थेत पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्याठिकाणी त्यांना आराध्या नजरेत पडली. आराध्याला सुखरूप पाहून सर्वानाच आनंद झाला. दरम्यान आता महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी दाखवलेल्या जागरूकतेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.