Kolhapur Crime News | हॉंगकॉंगमधून कागद मागवून छापल्या बनावट नोटा, दोघेजण अटकेत, केंद्रीय तपास यंत्रणेची कारवाई

कोल्हापूर : Kolhapur Crime News | हॉंगकॉंग येथून हाय सिक्युरिटी थ्रेडचा कागद मागवून बनावट नोटा छापणाऱ्या आणि त्या चलनात आणणाऱ्या दोघांना करवीर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. सिद्धेश श्रीकांत घाटगे (रा- दत्तोबा शिंदेनगर कळंबा, ता- करवीर) आणि विकास वसंत पानारी (रा- शिवसृष्टी पार्क, शाकंभरी कॉलनी, शिंगणापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Fake Currency Detection)
गुरुवारी (दि.२०) रात्री ही कारवाई करण्यात आली. यांच्याकडून बनावट नोटा, छापलेले प्रिंटर्स पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी संशयित आरोपींना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेला सिद्धेश घाटगे हा घरी बनावट नोटा छापत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी गोपनीयपणे सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी घाटगे हा सरकारचा महसूल बुडवण्यासाठी बाहेरील देशातून साधनसामग्री मागवून बनावट नोटा छापत होते. त्यांना अटक करून त्यांच्याकडील ए फोर साइझचे ४ पेपर, ५० रुपयांच्या ६ बनावट नोटा, २०० रुपयांच्या ४ बनावट नोटा, ५०० रुपयांच्या ४ बनावट नोटा, कोऱ्या कागदावर हाय सिक्युरिटी थ्रेड असलेली रंगीत पट्टी त्यावर आरबीआय आणि भारत असे छापलेले कागद जप्त करण्यात आले आहेत.
सिद्धेश घाटगे याच्याकडे चौकशी केल्यानंतर बनावट नोटा चलनात आणणारा विकास पानारी यालाही पोलिसांनी अटक केली. केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून याची नोंद पोलिसात करण्यात आली आहे.