Pimpri Chinchwad Police News | पुणे : ऑन ड्युटी असलेल्या सहायक पोलिस फौजदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू

पुणे / पिंपरी : Pimpri Chinchwad Police News | तळवडे वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या सहायक पोलिस फौजदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. किसन नामदेव वडेकर (वय-५५) असे त्यांचे नाव आहे. बालेवाडी येथे बंदोबस्ताबाबत शुक्रवारी (दि.२१) नियोजन बैठक सुरु असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा धक्का बसला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अतिशय मनमिळावू, शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची पोलिस दलात ओळख होती. त्यांच्या निधनाने शहर पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक माहितीनुसार, किसन वडेकर हे तळवडे वाहतूक विभागात पोलिस निरीक्षक यांचे रीडर म्हणून काम पाहत होते. शनिवारी (दि.२२) बालेवाडी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एका कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
वाहतूक नियोजनासाठी शुक्रवारी (दि.२१) सकाळी बालेवाडी स्टेडियम येथे नियोजन सुरु होते. त्याचवेळी अचानक किसन वडेकर यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. किसन वडेकर हे पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात कार्यरत होते. त्यांनी चिखली, निगडी पोलिस ठाण्यात काम केले आहे. त्यांची मागील काही महिन्यांपूर्वी तळवडे वाहतूक विभागात बदली झाली होती.