Kalyan Crime News | दुर्दैवी ! पहाटेच्या अंधारात मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी गेले, पोलीस अधिकाऱ्याला लोकलची धडक

कल्याण : Kalyan Crime News | मध्य रेल्वेच्या तानशेत खर्डी स्टेशन दरम्यान रात्री १२ वाजताच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळाली होती. दरम्यान या मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी कल्याण रेल्वेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गरजे घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करत असताना अचानक दोन्ही बाजूंनी लोकल आल्याने गरजे यांना अंदाज आला नाही, यात लोकलची धडक लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
ही घटना आज शुक्रवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. जखमी गरजे यांना उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कल्याण रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा तानशेत खर्डी दरम्यान रेल्वे ट्रॅक लगत एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती रेल्वे मोटरमनकडून रेल्वे पोलिसांना देण्यात आली. कल्याण रेल्वे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गरजे पहाटेच्या अंधारात घटनास्थळी पंचनामा करत असताना अचानक दोन्ही बाजूंनी एकाच वेळी लोकल आल्या. लोकलचा अंदाज न आल्याने लोकलची धडक लागून गरजे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.