Eknath Shinde | मला हलक्यात घेऊ नका, एकनाथ शिंदेंचा नागपूरात इशारा; उपमुख्यमंत्र्यांचा रोख कोणाकडे? राजकीय चर्चांना उधाण

Cm-eknath-shinde

नागपूर : Eknath Shinde | गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याचे बोलले जात असतानाच शुक्रवारी शिंदे यांनी नागपूरात पत्रकारांशी बोलताना म्हटले की, मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी घ्यावा. आता हा इशारा नेमका विरोधकांसाठी आहे की, सत्तेतील सहकार्यांसाठी आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शुक्रवारी नागपूरात शिवसेना पदाधिकार्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यात सहभागी होण्याकरता शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री शिंदे नागपूर दौर्यावर आले होते. तत्पूर्वी पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. या दरम्यान त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकाही केली. ते म्हणाले की मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा. आता शिंदेनी हा इशारा नेमका कोणाला दिला या वरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून शिंदे महायुतीत नाराज असल्याचे बोलले जात आहे. अनेक मंत्रिमंडळ बैठकीला त्यांची अनुपस्थिती होती, तर आपल्या सातार्यातील दरेगाव येथील मुक्काम ही त्यांनी वाढवला होता.

दरम्यान शुक्रवारी विदर्भ दौर्यावर ते पक्षाच्या दोन मेळाव्यांत सहभागी होण्याकरता आले होते. ते म्हणाले की, निवडणूक प्रचारात मी सांगितले होते की, निवडणूक जिंकल्यानंतर मी येईल, त्या अनुषंगाने आजचा दौरा आहे. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आमची जबाबदारी वाढली आहे. लोकांचे आभार मानायला मी विदर्भात आलो आहे. मी आधीच बोललो आहे, ज्यांनी मला हलक्यात घेतले त्यांचा मी 2022 मध्ये टांगा पलटी केला. मी बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचा कार्यकर्ता आहे. त्याच अनुषंगाने सर्वांनी माझे मूल्यमापन करावे. निवडणुकीत आधीच सांगतिले होते की, मी आणि देवेंद्र फडणवीस 200 पेक्षा जास्त जागा निवडून आणू, यंदाच्या निवडणुकीत 232 जागा आणल्या आहेत. त्यामुळे लोकांनी मला हलक्यात घेऊ नये, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांना व संबंधितांना थेट इशाराच दिला आहे.