Manikrao Kokate | मोठी बातमी! महायुतीचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा, मंत्रिपदासह आमदारकी जाण्याची शक्यता

मुंबई : Manikrao Kokate | फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. महायुती सरकारसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, प्रत्येक योजनेत 2-4 टक्के भ्रष्टाचार होतच असतो, असे वक्तव्य केल्याने कोकाटे हे काही दिवसांपूर्वीच अडचणीत आले होते.
काय आहे प्रकरण
1995 साली कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. यासंबंधीची याचिका माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी नाशिक न्यायालयात दाखल केली होती. याच प्रकरणात कोकाटे यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.
लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते, असा कायदा आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद, तसेच आमदारकी सुद्धा जाऊ शकते. या निकालामुळे माणिकराव कोकाटे यांची राजकीय कारकिर्द धोक्यात आली असून महायुती सरकारला सुद्धा हा धक्का असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, माणिकराव कोकाटे हे या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देऊन शिक्षेला स्थगिती मिळवू शकतात. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात तसेच काही घोटाळ्यांचे आरोप झाल्याने मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आलेले असताना आता मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा सुनावल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला हा मोठा धक्का बसला आहे.