GBS In Pune | शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या तरुणीचा जीबीएस आजारामुळे मृत्यू; रुग्णांची संख्या 183 वर पोहोचली

पुणे : GBS In Pune | जीबीएस आजाराने आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. किरण राजेंद्र देशमुख (वय-२१) असे जीबीएस आजाराने मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान आता पुण्यात जीबीएस आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.

अधिक माहितीनुसार, गेल्या तीन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून किरणची या आजाराशी झुंज सुरू होती. बारामतीतील किरण ही सिंहगड परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे राहत होती. याच दरम्यान तिला जीबीएस आजाराची लागण झाली. आजारी पडल्यानंतर किरण आपल्या आई-वडिलांकडे म्हणजे बारामतीला गेली. जुलाब आणि अशक्तपणामुळे बारामतीत कुटुंबांकडे आलेल्या किरणला तिच्या कुटुंबीयांनी बारामतीतील तज्ज्ञांना दाखवले.

बारामतीत तिच्यावर उपचार करण्यात आले मात्र याचा काहीही फरक जाणवला नाही. तेव्हा तज्ज्ञांना तिच्या लक्षणावरून जीबीएस आजाराबाबत शंका आली आणि त्यांनी किरणला पुण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला तातडीने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. २७ जानेवारीपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने तिचा मंगळवारी (दि.१७) रुग्णालयात मृत्यू झाला.

दरम्यान, पुण्यामध्ये १८३ रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे. २८ रुग्ण संशयित आहेत. तर आतापर्यंत १० जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. ४२ रुग्ण पुणे मनपा, ९४ रुग्ण हे नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट झालेल्या गावातील आहेत. ३२ रुग्ण पिंपरी-चिंचवड आणि ३३ रुग्ण पुणे ग्रामीण तसेच १० इतर जिल्ह्यातील आहेत. यापैकी १३९ रुग्णांना डीस्चार्ज देण्यात आला आहे. ३९ रुग्ण आयसीयूमध्ये तर १८ व्हेंटिलेटरवर आहेत.