Wakad Pune Crime News | पुणे: वर्गमित्राकडून प्रेमाचा गैरफायदा घेत शारीरिक आणि मानसिक त्रास ! 20 वर्षीय इंजिनिअरिंगच्या तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

पुणे : Wakad Pune Crime News | इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय तरुणीने १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सहिती रेड्डी (वय-२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना ताथवडे येथे ५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास घडली. (Engineering Girl Suicide)
याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, वर्गमित्र मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याने तरुणीने आत्महत्या केल्याचे आता तपासात उघड झाले आहे. सहितीचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी (वय- ५४, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार १२ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रणव राजेंद्र डोंगरे (वय- २०, रा. आकुर्डी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहिती हिने ५ जानेवारी रोजी सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास राहत्या इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, सहिती हिचे मित्र- मैत्रिणी फिर्यादी कलुगोटाला रेड्डी यांना भेटण्यासाठी आले.
सहिती हिने मृत्युपूर्वी तिच्या मोबाईल वरून मैत्रिणीला मोबाईलचा पासवर्ड आणि सोसायटीमधील मित्राचा नंबर शेअर केला असल्याचे मैत्रिणीने सहितीच्या कुटुंबियांना सांगितले. त्यानुसार कुटुंबीयांनी सहितीचा मोबाईल फोन अनलॉक केला. त्यामध्ये सहितीने मित्र प्रणव, आई-वडील आणि सर्वांसाठी असे तीन व्हॉइस रेकॉर्डिंग करून ठेवले होते.
सहिती आणि तिचा वर्गमित्र प्रणव यांचे प्रेमसंबंध होते. सहितीच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन प्रणव हा तिला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी प्रणव डोंगरे याला अटक केली.