Shivsena Vs Ajit Pawar | ”अजित पवार भूमिपूजनासाठी आले तर….”, महायुतीमधील अंतर्गत वाद चिघळला, शिंदे सेनेच्या ‘त्या’ कार्यकर्त्याला अटक

नाशिक : Shivsena Vs Ajit Pawar | महायुती सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद रोजच्या रोज समोर येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक दिवसांपासून नाराज असल्याचे समजते. वरिष्ठ स्तरावर अशी स्थिती असताना राज्यातील विविध भागात देखील अशीच स्थिती आहे. नाशिकच्या देवळाली मतदार संघात तर हा वाद टोकाला गेला आहे. येथील शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याने थेट अजित पवारांना जाळून मारण्याची धमकी सोशल मीडियावर दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचा कामाचे श्रेय घेण्यावरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार सरोज अहिरे आणि शिंदे शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्यातील हा श्रेयवाद आहे. या योजनेच्या भूमिपूजनासाठी दोन दिवसांपूर्वी अजित पवार नाशिकमध्ये आले होते.

नाशिक दौर्‍यावर आलेल्या अजित पवारांना भगूरमध्ये आल्यानंतर पेट्रोल टाकून जाळा अशा प्रकारचे मेसेज शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले. या मेसेजमुळे पोलिसांनी 45 वर्षीय संतोष फोकणे नावाच्या संशयिताला याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.

या घटना घडल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी मागणी केली की, अजित पवारांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी.