Shivsena To Ajit Pawar On Dhananjay Munde | ‘दादा, दुहेरी भूमिका नको, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठोस निर्णय घ्या’, अजित पवारांना शिंदे सेनेचा रोखठोक सल्ला

मुंबई : Shivsena To Ajit Pawar On Dhananjay Munde | सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील (Santosh Deshmukh) मुख्य आरोपी वाल्किम कराडशी असलेले निकटचे संबंध आणि काही घोटाळे समोर आल्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मुंडे यांची पाठराखण करत आहेत. एकमेकांवर निर्णय ढकलत आहेत.
आता तर अजित पवार यांनी आपल्या नैतिकतेचे उदाहरण देत राजीनाम्याचा निर्णय मुंडे यांच्याकडेच टोलवला आहे. यावरून आता महायुतीमधील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनीच अजितदादांना रोखठोक सुनावले आहे.
अजित पवार यांना नाशिकमध्ये पत्रकारांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला होता. यावर अजित पवार म्हणाले की, जेव्हा सिंचन घोटाळ्याचा माझ्यावर आरोप झाला तेव्हा मी नैतिकता दाखवून राजीनामा दिला होता. यावर पत्रकारांनी त्यांना धनंजय मुंडे नैतिकता दाखवणार का, असा सवाल केला असता, अजित पवार म्हणाले, ते तुम्ही त्यांनाच विचारा.
पवार यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटत आहेत. आता तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने पवार-फडणवीसांना घरचा आहेर दिला आहे. म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या बाजूने शिंदे असल्याचे स्पष्ट होत आहे.
अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले की, दोन भूमिका घेऊन चालणार नाही. कोणाला मंत्री करायचं, कुणाचा राजीनामा घ्यायचा, हे अधिकार अजित पवार यांचेच आहेत.