Kolhapur Crime News | ऑफिसमधून बाहेर पडताना पत्नीला फोन, बेपत्ता तरुणाचा मृतदेह शिंगणापूर बंधाऱ्यात आढळला, आत्महत्या की घातपात ? पोलीस तपास सुरु

कोल्हापूर : Kolhapur Crime News | दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सोमवार (दि.१७) सायंकाळी पंचगंगा नदीत शिंगणापूर बंधाऱ्यात आढळला. सूरज शिवाजी पाटील (वय-३५ रा. हरिप्रिया कॉलनी, शिंगणापूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो शिंगणापूर बंधाऱ्यावरून घरी परतताना त्याची मोपेड घसरून बंधाऱ्यावरून पाण्यात पडली असण्याची शक्यता आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिसात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सूरज पाटील हा कोल्हापूर शहरातील शाहूपुरी येथील फायनान्स कंपनीत होता. शनिवारी (दि.१५) तो सहकारी कर्मचाऱ्यांच्यासोबत ताराबाई पार्क येथे नियोजित क्रिकेटचा सामना खेळला. त्याने ऑफिसमधून बाहेर पडताना पत्नीला साडेआठच्या दरम्यान घरी येणार असून तुम्ही जेऊन घ्या, असा फोन केला.
मात्र, त्यानंतर सूरजचा फोन बंद झाल्याने संपर्क झाला नाही. सुरज हा दररोज रात्री ८ ते ९ च्या दरम्यान घरी येत असे, अशी माहिती नातेवाईक नारायण भांदिगिरे यांनी पोलिसांना दिली. ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर तो आपल्या दुचाकीवरून कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावरून प्रवास करताना एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर तो बेपत्ता होता. दाखल फिर्यादीनुसार पोलीस त्याचा शोध घेत होते.
दरम्यान सोमवारी (दि.१७) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पंचगंगा नदीत शिंगणापूर बंधाऱ्याजवळ सूरजचा मृतदेह पाण्यावर तरंगताना ग्रामस्थांना आढळला. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा झाल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणात आत्महत्या की घातपात ? या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत. त्याची मोपेड शोधण्याचे काम पोलिस रात्री उशिरापर्यंत करत हाते. सूरजच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.