Nanded City Pune Crime News | घरगुती भांडणात ढकलून दिल्याने बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यु; चुलत भावाला नांदेड सिटी पोलिसांनी केली अटक

पुणे : Nanded City Pune Crime News | घरगुती भांडणात अंगावर धावून आल्याने ढकलून दिल्याने बाल्कनीतून पडून एका तरुणाचा मृत्यु झाला. पण ज्याने ढकलून दिले तो आणि हा प्रकार पाहणारा दोघांनी कोणाला काहीही सांगितले नाही. दुसर्या दिवशी सकाळी जेव्हा हा प्रकार समोर आला. त्यानंतर नांदेड सिटी पोलिसांनी याच्या मागील कारण शोधून काढून चुलत भावाला अटक केली आहे.
राजु भुरेलाल देशमुख (रा. कपील अपार्टमेंट, मतेनगर, धायरीगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अमर किसन देशमुख (वय ३५, रा. कपील अपार्टमेंट, मतेनगर, धायरीगाव) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मोहपत हरीराम साहारे (वय ३६, रा. धायरीगाव) यांनी नांदेडसिटी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना १५ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेआठ वाजता घडली होती.
याबाबत नांदेडसिटी पोलीस ठाण्याचे (Nanded City Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी सांगितले की, राजु देशमुख व त्यांचा चुलत भाऊ अमर देशमुख व इतर दोघे जण हे मुळचे मध्यप्रदेशातील आहे. ते एका सोनपापडीच्या कारखान्यात काम करतात. कपील अपार्टमेंटमध्ये एकत्र राहतात. राजू व अमर यांच्यामध्ये त्यांच्या गावाकडील पत्नीबाबत बोलण्यावरुन भांडणे झाली. तेव्हा अमर हा मारण्यासाठी राजूच्या अंगावर धावला. त्यावेळी राजू याने अमर याला ढकलून दिल्याने तो बाल्कनीतून खाली पडला. खाली पडलेल्या अमर देशमुख याला कोणतीही मदत न करता राजू हा घरात गप्प बसून राहिला. हा सर्व प्रकार साहारे याने पाहिला असतानाही तो कोणाला काहीही न सांगता तेथून निघून गेला होता. दुसर्या दिवशी सकाळी अमर देशमुख याचा मृत्यु झाल्याचे समजले. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. तेव्हा राजू देशमुख याने घडलेला प्रकार सांगितले. मृत्युस कारणीभूत ठरल्याबद्दल राजू देशमुख याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे तपास करीत आहेत.