Nagpur Crime News | ‘सगळ्यात मोठा गुंड कोण?’, म्हणत वाद पेटला, मद्यधुंद मैफिल रक्ताने झाली लाल, चाकूने सपासप वार करत मित्राला संपवलं

नागपूर : Nagpur Crime News | काही मित्र एकत्र मिळून मद्यपान करीत असताना झालेल्या शुल्लक वादातून युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कार्तिक चौबे (वय- २८)असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रोशन गायकवाड असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. ही घटना सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत क्वार्टर परिसरात घडली. कार्तिक चौबे गुंड प्रवृत्तीचा असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आणि आरोपी रोशन गायकवाड हे सोबत दारू प्यायला बसले होते, पण क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. सगळ्यात मोठा गुंड कोण? यावरुन त्यांचा वाद पेटला. कार्तिकने रोशनच्या डोक्यात बिअरची बॉटल मारली, त्यानंतर रोशनने त्याच्याकडचा चाकू बाहेर काढला आणि कार्तिकच्या छातीवर सपासप वार केले. या हल्ल्यात कार्तिकचा जागीच मृत्यू झाला. सोबत दारू पित असताना त्यांच्यासोबत आणखी दोन ते तीन जण होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यांच्यासोबत प्यायला बसलेल्यांचा यात काही सहभाग आहे का? याचाही तपास पोलीस करीत आहेत.
कार्तिकची आई आरती उमेश चौबे (वय-५५) या रुग्णांना मदतनीस उपलब्ध करून देतात, तसेच त्या नर्सरी शाळेमध्ये शिक्षिका आहेत. आरती चौबे यांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. रुग्ण सेवा देऊन आरती चौबे घरी आल्या तेव्हा त्यांना शेजारच्यांनी कार्तिकवर हल्ला झाल्याची माहिती दिली. यानंतर आरती चौबे रुग्णालयात पोहोचल्या. मात्र त्याठिकाणी गेल्यानंतर कार्तिकचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना मिळाली. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.