Mulshi Dam News | मुळशी धरण परिसरात 8 मित्रांनी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला, पाण्याच्या अंदाज न आल्याने दोघे बुडाले, शोधमोहिम सुरू

पुणे : Mulshi Dam News | मुळशी धरण भागात ढोकळवाडी-चाचिवली येथे पर्यटनासाठी आलेल्या ८ मित्रांमधील दोघेजण बुडाल्याची घटना रविवारी (दि.१६) दुपारी घडली आहे. अनिश राऊत (वय- १८, डॉ. पाटील कॉलेज, पिंपरी) आणि विशाल राठोड (वय- १७, फत्तेचंद जैन विद्यामंदिर चिंचवड) अशी दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पडवळनगर- थेरगाव पिंपरी येथील अविश राऊत, विशाल राठोड, गोविंदा चाकली (वय-१६), जीत लोंढे (वय-१७), अथर्व राऊत (वय-१६), राज यादव (वय-१७), सोहम जाधव (वय-१६), आदित्य बाबर (वय-२०) हे ८ मित्र मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. यादरम्यान ते चाचिवली ढोकळवाडी येथे धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले.

दरम्यान अनिश व विशाल या दोघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे दोघे बुडाले. पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव, आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे व पथक, हिंजवडी येथील स्क्युबा डायव्हींगचे पथक यांच्याकडून शोधमोहिम सुरू आहे.