Hadapsar Pune News | पुणे: हडपसरमधील एका सोसायटीतील 9 व्या मजल्यावरील साडेतीन BHK मध्ये आढळल्या 300 मांजरी, प्रचंड खळबळ

पुणे : Hadapsar Pune News | हडपसर येथील मार्वल बॉन्टिक को- ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत नवव्या मजल्यावर साडेतीन बीएचके सदनिकेत मागील पाच ते सहा वर्षांपासून मांजरी पाळल्या जात असल्याची तक्रार सोसायटीतील नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. त्यानंतर महापालिका आणि पोलिस बंदोबस्तात सदनिकेची पाहणी करण्यात आली. त्यावेळी या सदनिकेत ३०० पेक्षा जास्त मांजरी आढळून आल्या आहेत.

सोसायटीतील नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पुणे महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी सारिका फुंदे यांनी गुरुवारी (दि.१३) संबंधित सदनिकेच्या बाहेर उभे राहून दार उघडण्याची विनंती केली. मात्र, सदनिकाधारकाने व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एक तास दार उघडले नाही. अखेर, पोलिसांच्या मदतीने दार उघडण्यात आले. त्यावेळी सदनिकेच्या हॉल आणि बेडरूममध्ये सुमारे ३०० हून अधिक मांजरी असल्याचे आढळले.

या मांजरी सदनिकेतून बाहेर काढून त्यांचे पुढील ४८ तासात दुसरीकडे स्थलांतर करण्याची नोटीस सदनिकाधारक रिंकू भारद्वाज आणि बहीण रितू भारद्वाज यांना महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. हडपसर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया कोल्हेवाड याविषयी तपास करीत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मांजरी पाळल्याने सोसायटीच्या आवारात दुर्गंधी होत असून, मांजरांच्या ओरडण्याच्या आवाजाने रहिवासी त्रस्त झाले होते. अनेक वेळा महानगरपालिकेला तक्रार केल्यानंतर अखेर ही कारवाई करण्यात आली.

सदनिकेत मागील पाच ते सहा वर्षांपासून मांजरी पाळल्या जात असल्याची तक्रार सोसायटीतील नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. या मांजरीची विष्ठा ‘ड्रेनेज लाइन’ मध्ये टाकली जात असे आणि कामगार ती घाण सोसायटीबाहेर घेऊन जात असत. यामुळे सोसायटीत मोठी दुर्गंधी पसरली आहे. या मांजरी पाळण्यासाठी सुमारे १० ते १४ कामगार नेमले होते. लिफ्टमधून विष्ठा नेताना स्थानिक रहिवाशांना त्रास होत होता. दरम्यान आता या मांजरी सदनिकेतून बाहेर काढून त्यांचे पुढील ४८ तासात दुसरीकडे स्थलांतर करण्याची नोटीस महापालिकेकडून देण्यात आली आहे.