Chandrashekhar Bawankule | प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे कार्यकर्त्यांना अजब आवाहन, ”आगामी निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण, मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांना भाजपचे सभासद करा”

कोल्हापूर : Chandrashekhar Bawankule | राज्यातील सर्व जिल्हा परिषदा आणि महापालिकांमध्ये भाजपची सत्ता यायला हवी. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 16 लाख इतकी भाजप सदस्य नोंदणी झाली आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लाडकी बहीण योजनेचे 2 कोटी 20 लाख तर मोफत वीज योजनेच्या 40 लाख कृषी पंपधारकांना भाजपचे सभासद करुन घ्या, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापुर येथे पक्षाच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले. यावेळी ज्येष्ठे नेते चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पुढील 15 वर्षे राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत राहण्यासाठी सर्व जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्यांमध्ये भाजपची सत्ता येण्यासाठी राज्यात 1 कोटी 51 लाख सदस्य असणे आवश्यक आहे.
बावनकुळे म्हणाले, राज्यात भाजपचे अधिकाअधिक सदस्य झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 13 हजार जणांना भाजपकडून उमेदवारी दिली जाईल. राज्यातील सर्व 36 जिल्हा परिषद आणि 27 महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.
भाजपच्या कोल्हापूरमधील या कार्यशाळेला चंद्रकांत पाटील, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत बावनकुळे यांनी दिले.