Ajit Pawar On Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांचे सूचक आणि थेट वक्तव्य, दादा नेमकं काय म्हणाले…

नाशिक : Ajit Pawar On Dhananjay Munde | सरपंच संतोष देशमुख खूनप्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) प्रमुख आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्याशी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे संबंध असल्याने महायुती सरकारची प्रतिमा मोठ्या प्रमाणात मलिन होत आहे. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधीपक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि राज्यातील जनतेकडून सातत्याने होत आहे. मात्र, या प्रकरणात धनंजय मुंडे यांची कालपरवापर्यंत पाठराखण करणारे अजित पवार यांनी काल या संदर्भात केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

काल (रविवारी,16) नाशिकमध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश न्यायालयाच्या उद्घाटनानिमित्त उपमुख्यमंत्री पवार यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी हे वक्तव्य केले.

अजित पवार म्हणाले, बीड येथील घटना निर्दयी आहे. असे काही तरी कुणी करू शकते, हे सहनच होत नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, आम्ही कोणालाही वाचवत नाही. त्यासाठी लोकांनी महायुतीचे 237 आमदार निवडून दिले नाहीत. जनतेसाठी आम्हाला काम करावेच लागेल.

नैतिकतेच्या आधारे राजीनामा का घेतला जात नाही, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, मी 34 वर्षे विविध खाती सांभाळली आहेत. स्वच्छपणे कारभार केला, तरीही सिंचन गैरव्यवहाराचे आरोप माझ्यावर झाले. सचिवांकडून माहिती घेऊनच मी निर्णय घेत असतो. तरीही माझ्यावर आरोप झाले, त्यामुळे व्यथित होऊन मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला होता.

देशात अनेक घटनांमध्ये पूर्वी लालबहादूर शास्त्री, आर. आर. पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी राजीनामा दिला आहे. पण त्यानंतर अनेक घटना घडल्या, पण कुणी राजीनामा दिल्याचे मला आठवत नाही, असे म्हणत पवार यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले.

थोडक्यात, सिंचन गैरव्यवहारात माझ्यावर आरोप झाल्यावर व्यथित होऊन नैतिकेला धरून मी तत्काळ राजीनामा दिला होता, असे म्हणत पवार यांनी राजीनाम्या बाबतचा निर्णय धनंजय मुंडे यांच्याकडे ढकलला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आतातरी धनंजय मुंडे नैतिकता दाखवणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.