Accident News | प्रयागराज येथून अयोध्येकडे निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात महाराष्ट्रातील चौघांचा मृत्यू तर 16 जण जखमी

नांदेड : Accident News | प्रयागराज येथून अयोध्येकडे निघालेल्या भाविकांची मिनी बस थांबलेल्या बसला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात नांदेड येथील चौघांचा मृत्यू झाला आहे तर १६ जण जखमी झाले आहेत. या अपघातात सुनील दिगंबर वरपडे (वय-५०), अनुसया दिगंबर वरपडे (वय-८०), दीपक गणेश स्वामी (वय-४०, सर्व रा- छत्रपती चौक, नांदेड) आणि जयश्री कुंडलिकराव जाधव (वय-५०, रा. अडेगाव रंजेबुवा ता. वसमत, जि. हिंगोली) या भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रविवार (दि.१६) पहाटे साडेपाचच्या सुमारास बाराबंकी जिल्ह्यात घडली.

अधिकच्या माहितीनुसार, नांदेड शहरातील छत्रपती चौक भागातील काही भाविक मिनी बसने प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. प्रयागराजमध्ये स्नान करून ते अयोध्येकडे निघाले होते. उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील लोणी कटाराजवळील पुर्वांचल एक्स्प्रेसवरून जात असताना मिनी बस नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स बसला धडकली. अपघात एवढा भीषण होता की मिनी बसच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला.

यामध्ये चैतन्य राहुल स्वामी (वय-१६), शिवशक्ती गणेश गोदले (वय-५५), भक्ती दीपक गोदले (वय-३०), रंजना रमेश मठपती (वय-५५), गणेश गोदले (वय-५५), अनिता सुनील वरपडे (वय-४०), वीर सुनील वरपडे (वय-९), सुनीता माधवराव कदम (वय-६०), छाया शंकर कदम (वय-६०), ज्योती प्रदीप गैबडी (वय-५०), आर्या दीपक गोदले (वय-५), लोकेश गोदले (वय-३५), श्रीदेवी बरगले (वय-६०, सर्व रा. नांदेड) हे जखमी झाले आहेत. तर अन्य जखमींची नावे समजू शकली नाहीत.

लोणीकटारा पोलिसांनी जखमींना गोसाईगंज रुग्णालयात दाखल केले आहे. तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. जखमींचे नातेवाईकांनी गोसाईगंज रुग्णालयाकडे धाव घेतली आहे.