Pune Crime Branch News | 50 हून अधिक गुन्हे असलेल्या अट्टल गुन्हेगाराने कारागृहातून सुटल्यावर 5 महिन्यात चोरल्या 25 दुचाकी; दोघांना अटक, गुन्हे शाखेच्या युनिट 3 ची कामगिरी (Video)

पुणे : Pune Crime Branch News | ५० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगाराची कारागृहातून जामीन मिळाल्यानंतर गेल्या ५ महिन्यात त्याने तब्बल २५ दुचाकी चोरल्याचे पोलिसांच्या कारवाईमध्ये उघड झाले आहे. त्याने गॅरेज मालकाच्या मदतीने या गाड्या फायनान्स कंपनीच्या ओढून आणलेल्या गाड्या असल्याचे सांगून त्यांची विक्री केली होती. (Vehicle Theft Detection)

शंकर भरत देवकुळे (वय ३२, रा. मेमाणे वस्ती, उरुळी देवाची) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पर्वती येथील एक दुचाकी चोरीचा पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते तपास करत होते. या गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन ही चोरी शंकर देवकुळे याने केल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणावरुन शंकर देवकुळे याला इचलकरंजी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केल्यावर तो पाच महिन्यांपूर्वी तुरुंगातून सुटून आला होता. पुणे शहर परिसरातून दुचाकी वाहने चोरी करुन तो गाड्यांच्या नंबरप्लेट काढून टाकून या गाड्या त्याचा ओळखीचा गॅरेज मालक अनिकेत सुनिल कुदळे (वय २७, रा. खडकी, ता. दौंड) याला नेऊन देत असे. तो दौंडमधील खडकी येथील भैरवनाथ गॅरेज येथे विक्रीसाठी ठेवत असे. शंकर देवकुळे याचा तुळजापूरचा मित्र याच्याकडे त्याने दिलेल्या २ दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच आणखी एका मित्राला विकलेली १ दुचाकी व त्याचेकडे विक्रीकरता ठेवलेल्या ४ दुचाकी जप्त केल्या आहेत. अशी एकूण २५ वाहने जप्त केली आहे. या वाहनांबाबत पुणे शहर व इतर ठिकाणी वाहन चोरीचे एकूण १८ गुन्हे दाखल आहेत. उर्वरीत ७ वाहनांच्या मालकांचा शोध सुरु आहे.

शंकर देवकुळे हा सराईत वाहनचोर आहे. त्याच्यावर पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयात ५० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मेट्रो स्टेशनजवळ व सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या ज्या गाड्यांचे लॉक जुने झाले आहे, अशा दुचाकी हेरुन डुप्लिकेट चावी वापरुन त्या चोरी करुन घेऊन जात होता. शंकर देवकुळे हा गॅरेज मालक अनिकेत कुदळे याला ‘‘मी फायनान्स कंपनीत कामाला आहे. हप्ते न भरलेल्या गाड्या ओढून आणतो,’’ असे सांगत असे. त्याप्रमाणे अनिकेत याला विक्री करण्यासाठी देत होता. अनिकेत हा कागदपत्राबाबत व मालकीबाबत कोणतीही खात्री न करता शंकर देवकुळे याला साथ देऊन त्या दुचाकी वाहनांचे चेसीस नंबर, व इंजिन नंबर ग्राईडरने खराब करुन त्या दुचाकी गावामधील शेतकर्‍यांना व गरजुंना कागदपत्रे नंतर देतो, असे सांगून विकत होता.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, सहायक फौजदार मधुकर तुपसौंदर, पोलीस अंमलदार शंकर वाकसे, संजीव कळंबे, सुजित पवार, विनोद भंडलकर, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, चेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, महेंद्र तुपसौंदर, उदय राक्षे, भाग्यश्री वाघमारे, शुभांगी म्हाळसेकर यांच्या पथकाने केली आहे.