Pune Crime Branch News | पार्किंगच्या बॅकअपसाठी ठेवलेल्या बॅटरी चोरणार्‍या गुन्हेगाराला अटक; शोधण्यासाठी गेलेल्या पथकाच्या समोरच आरोपी येऊन हजर

Arrest Logo

पुणे : Pune Crime Branch News | शुक्रवार पेठेतील सोसायटीच्या कार्यालयात पार्किंगच्या बॅकअपसाठी ठेवलेल्या ८ बॅटर्‍या चोरुन नेणार्‍या चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने पकडले. (Arrest In Theft Case)

सुरज नामदेव साठे Suraj Namdev Sathe (वय ३२, रा. दांडेकर पुल, सध्या रा़ राजीव गांधी वसाहत, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) असे या चोरट्याचे नाव आहे़ त्याच्याकडून १ लाख २० हजार रुपयांच्या ८ अ‍ॅमरॉन कंपनीच्या बॅटर्‍या व गुन्हा करताना वापरलेली रिक्षा असा १ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

शुक्रवार पेठेतील साठे कॉलनीमधील आशिर्वादम अपार्टमेंटममधून ४ फेब्रुवारी रोजी ही चोरी झाली होती. खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास युनिट १ चे पथक करत होते. सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व त्यांचे सहकारी सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने आरोपीने गुन्हा करताना वापरलेल्या रिक्षाचा शोध घेत होते. पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ही रिक्षा हिंगणे खुर्द येथील राजीव गांधी वसाहतीतील सुरज याची आहे. या बातमीवरुन पोलीस पथक राजीव गांधी वसाहतीत पोहचले. त्याचवेळी त्यांच्या समोरुन एक जण चालत येताना दिसले. पोलिसांना मिळालेल्या वर्णनासारखाच तो असल्याने पोलिसांना संशय आला. त्याला पकडून नाव विचारता त्याने सुरज साठे असे सांगितले. तेव्हा आपण ज्याला शोधायला आलो, तोच आपल्यासमोर येऊन उभा ठाकल्याचे दिसून आले.

सुरज साठे याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने पत्नी वैशाली सुरज साठे व एका महिलेच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार राहुल मखरे, अनिकेत बाबर, दत्ता सोनवणे, शशिकांत दरेकर, निलेश जाधव, महेश बामगुडे, अभिनव लडकत, मयुरी जाधव यांनी केली आहे.