Maha Govt Bring Law Against Love Jihad | अमित शाह – फडणवीस भेटीनंतर सरकारच्या अजेंड्यावर ‘लव्ह जिहाद’, आता महाराष्ट्रातही कायदा करणार; समितीच्या स्थापनेचा जीआर जारी

मुंबई : Maha Govt Bring Law Against Love Jihad | महाराष्ट्रातील विद्यमान परिस्थितीचा अभ्यास करून लव्ह जिहाद विरोधातील कायदा करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, असा शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे. यामुळे लवकरच राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा लागू होऊ शकतो.
महायुती सरकारने लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी शुक्रवारी जी समिती स्थापन केली आहे, तिचे नेतृत्व राज्याचे पोलीस महासंचालक करणार आहेत. या समितीमध्ये 7 सदस्य असतील. सरकारच्या महिला व बालविकास, अल्पसंख्यांक विकास, विधी व न्याय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा प्रत्येकी एक सदस्य आणि गृह विभागाचे दोन सदस्य समितीवर घेण्यात आले आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी लव्ह जिहाद आणि व्होट जिहाद याबाबत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर वक्तव्य केले होते. बळजबरीने होणारे धर्मांतर, विशेष करून आंतरधर्मीय लग्नाच्या माध्यमातून होणारे धर्मांतर (लव्ह जिहाद) रोखण्यासाठी लवकरच कायदा करू, असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानुसार आता कार्यवाही सुरू झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान, राज्य शासनाने शुक्रवारी जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, राज्यातील विविध संघटना व काही नागरिकांनी लव्ह जिहाद व फसवणूक करून किंवा बळजबरीने केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत निवदेने सादर केली होती. भारतातील काही राज्यात लव्ह जिहादविरोधात कायदा करण्यात आला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या विरोधातील कायदा करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
समिती अशाप्रकारे करणार काम…
- महाराष्ट्रातील विद्यमान परिस्थितीचा अभ्यास करणे.
- त्यानुसार लव्ह जिहाद व फसवणूक करून किंवा बळजबरीने केलेले धर्मांतरण या अनुषंगाने प्राप्त तक्रारीबाबत उपाययोजना सुचवणे.
- कायदेशीर बाबी तपासणे व इतर राज्यांतील विद्यमान कायद्यांचा अभ्यास करणे.
- त्यानुसार कायद्याच्या अनुषंगाने शिफारस करणे.