Share Market News | मोदी-ट्रम्प द्विपक्षीय चर्चेनंतरही शेयर बाजारात घसरण, अदाणींचा मुद्दा आणि टेरिफ दराबाबत दिलासा न मिळाल्याचा परिणाम

वॉशिंग्टन : Share Market News | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काल द्विपक्षीय चर्चा झाली. या भेटीनंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय परस्पर सहकार्याची ग्वाही दिली. मात्र, भारतातून अमेरिकेत होणार्या निर्यातीवरील टेरिफ दराबाबत ट्रम्प यांनी सकारात्मक उत्तर दिले नाही, उलट भारताचेच टेरिफ दर जास्त असल्याचे ते म्हणाले.
याचा परिणाम आज शेयर बाजारावर दिसून आला. वास्तविक या भेटीनंतर बाजारात तेजी येईल अशी अपेक्षा होती, पण शेयर बाजारातील घसरण आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही सुरूच होती.
शेयर बाजार आज हिरव्या निशाणीसह खुला झाला. सेन्सेक्सने 76483 ची पातळी देखील गाठली. मात्र सव्वा अकरा वाजतानंतर तो आता 400 अंकाने खाली येऊन 75719 वर होता. तर निफ्टी-50 हा 170 अंकाने खाली येऊन 22872 च्या पातळीवर आला.
मागील दिवसांप्रमाणे आज देखील शेयर बाजाराने चांगली सुरूवात केली नंतर तो मंदावला. अदानी ग्रुपच्या कंपन्या अंदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट निफ्टी टॉप लूजर्समध्ये आहेत.
मोदी-ट्रम्प यांच्या वॉशिंग्टन डीसीमधील पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनी अदाणी लाच प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला. यावर मोदी म्हणाले, दोन देशांमधले दोन महत्त्वाचे नेते अशा वैयक्तिक प्रकरणांची चर्चा करत नाहीत.
तर अमेरिकेच्या टेरिफ वाढीच्या मुद्द्यावर ट्रम्प म्हणाले, भारतातले टेरिफ दर ही मोठी समस्या आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्याने टेरिफ दर वाढीबाबत संभ्रम कायम राहिला आहे. याचाच परिणाम आज भारतीय शेयर बाजारावर दिसून येत आहे.