Pune Crime News | पुणे: बदनामीकारक पत्रके वाटल्याने तरुणीचे मोडले लग्न; बदनामी थांबविण्यासाठी मागितली 15 लाखांची खंडणी

Marriage

पुणे : Pune Crime News | कुटुंबाविषयी बदनामीकारक मजकूर असलेले पत्रक मशिदमध्ये वाटले. मुलाच्या घरातील लोकांना दुसरे पत्रक पाठविल्याने तरुणीचे ठरलेले लग्न मोडले. बदनामी थांबवायची असेल तर १५ लाख रुपये द्या, अशी खंडणीची मागणी केली. ही बाब कोणाला सांगितली तर घरातील मुलीचा चेहरा अश्लिल व्हिडिओवर लावून व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत आळंदी रोड येथील एका ४२ वर्षाच्या भावाने लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जाहीद जाकी शेख (रा. ससाणेवाडा, भवानी पेठ) आणि २ अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कॅम्पमधील चोक्सी शाळेजवळील आयकॉन ऐव्हेन्यू येथे १७ जानेवारी व ८ फेब्रुवारी रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कॅम्पमधील महात्मा गांधी रोडवर दुकान आहे. त्यांच्या बहिणीचे लग्न ठरले होते. कॅम्पमधील मस्जिदमध्ये १७ जानेवारी रोजी छापिल पत्रके वाटण्यात आली. फिर्यादी यांच्या मित्रांनी ते पत्रक आणून दिले. त्यावर फिर्यादी यांच्या आई वडिलांचे फोटो छापून बदनामीकारक मजकूर लिहिला होता. शुक्रवारच्या नमाजासाठी मोठा समुदाय मस्जिद मध्ये जमतो. त्यावेळी ही पत्रके वाटून त्यांची बदनामी केली. त्यांच्या बहिणीचा साखरपुडा २५ जानेवारी रोजी ठरविण्यात आला होता. त्याच्या आधल्या दिवशी फिर्यादी यांचे आईवडिल, बहिणीविषयी बदनामीकारक मजकूर लिहिलेले पत्रक बहिणीच्या भावी पतीकडे पाठविण्यात आले. हे पत्रक वाचून त्यांनी बहिणीचे लग्न मोडले. त्यामुळे फिर्यादी यांच्या बहिणीला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

त्यानंतर काही दिवसांनी फिर्यादी यांच्या मित्राला तोंडाला मास्क लावलेल्या व्यक्तीने गाठले. त्याने सांगितले की, फिर्यादी यांची बदनामी थांबवायची असेल तर जाहिद शेख याला भेट असून म्हणून निघून गेला. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी फिर्यादी जाहिद शेख याला भेटले असता त्याने बदनामी थांबवायची असेल तर आम्हाला १५ लाख रुपये दे. जर पैसे दिले नाही तर घरातील मुलींचे फोटोचे अश्लिल व्हिडिओ बनवून व्हायरल करेल, अशी धमकी दिली. इतके पैसे देण्याची ऐपत नसल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे तपास करीत आहेत.