PM Narendra Modi-Donald Trump Meeting | मोदी-ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा; टेरिफ दराबाबत दिलासा नाहीच, मात्र तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदील! दोन्ही देशात महत्वाचे करार

वॉशिंग्टन : PM Narendra Modi-Donald Trump Meeting | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काल द्विपक्षीय चर्चा झाली. या भेटीनंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदत विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय परस्पर सहकार्याची ग्वाही दिली. दरम्यान, मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाला डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्यता दिल्याचे सांगितले. मात्र, टेरिफ दराबाबत ट्रम्प यांनी सकारात्मक उत्तर दिले नाही, उलट भारताचेच टेरिफ दर जास्त असल्याचे ते म्हणाले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतून परत पाठवण्यात आलेल्या भारतीयांबाबत ट्रम्प यांच्यासमोरच आपली भूमिका स्पष्ट केली. मोदी म्हणाले, हा मुद्दा फक्त भारताशी संबंधित नाही. इतर देशांमध्येही जे लोक बेकायदेशीररीत्या राहात आहेत, त्यांच्याशी संबंधितदेखील आहे. या लोकांना त्या देशांमध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही. आम्ही कायम हेच सांगत आलो आहोत की अमेरिकेत बेकायदेशीररीत्या राहणार्या आपल्या नागरिकांना परत घेण्यास भारत तयार आहे.
मोदी पुढे म्हणाले की, हे सर्व लोक सामान्य कुटुंबांमधले असून त्यांना फसवून अमेरिकेला नेण्यात आले आहे. त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेविरोधातच आपण पावले उचलण्याची गरज आहे.
यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला एफ35 फायटर जेट पुरवण्याचा करार अंतिम करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. अमेरिकेच्या टेरिफ वाढीच्या मुद्द्यावर ट्रम्प म्हणाले, भारतातले टेरिफ दर ही मोठी समस्या आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्याने टेरिफ दर वाढीबाबत संभ्रम कायम राहिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आमच्याकडे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त तेल आणि नैसर्गिक वायू आहे आणि भारताला त्याची गरज आहे. त्यामुळे भारत येत्या काळात आमच्याकडून खूप मोठ्या प्रमाणावर तेल आणि नैसर्गिक वायूची खरेदी करणार आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी हे ट्रम्प यांना म्हणाले की, निवडणुकीतील तुमच्या यशासाठी मी 140 कोटी भारतीयांकडून तुमचे अभिनंदन करतो. याचदरम्यान भारतातील लोकांनीदेखील एका व्यक्तीला सलग तिसर्यांदा देशाचा पंतप्रधान म्हणून सेवा करण्यासाठी निवडले हा योगायोग म्हणावा लागेल. ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे की यामुळे मला पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
बैठकीआधी व्हाईट हाऊसमध्ये मोदींचे स्वागत करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आम्हाला तुमची फार आठवण येत होती. यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली ट्रम्प म्हणाले, भारत व अमेरिकेत एक वेगळ्या प्रकारचा बाँड आहे. जगातली सर्वात जुनी आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. ट्रम्प म्हणाले, याच वर्षापासून भारताला निर्यात होणार्या लष्करी साहित्यामध्ये आम्ही हजारो कोटींच्या विक्री स्वरूपात वाढ करणार आहोत. अमेरिकेचे आण्विक तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी भारत सरकार त्यांच्या कायद्यांमध्ये बदल करत आहे.
दरम्यान, यावेळी वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनी अदाणी लाच प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला. यावर मोदींनी सडेतोड उत्तर दिले. मोदी म्हणाले, दोन देशांमधले दोन महत्त्वाचे नेते अशा वैयक्तिक प्रकरणांची चर्चा करत नाहीत.
या भेटीत डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी लिहिलेले ‘अवर जर्नी टुगेदर’ हे पुस्तक भेट दिले. ट्रम्प म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाटाघाटी करण्यामध्ये माझ्यापेक्षाही कट्टर आहेत. या बाबतीत मी त्यांच्या आसपासही नाही.