PM Narendra Modi | पत्रकाराने ट्रम्प यांच्यासमोरच पंतप्रधान मोदींना विचारला गौतम अदाणींबाबत प्रश्न, मोदी म्हणाले – ”अशा वैयक्तिक मुद्द्यांवर…”

वॉशिंग्टन : PM Narendra Modi | भारताचे पंतप्रधान दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौर्यावर होते. काल अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने पंतप्रधान मोदींना अदाणी लाच प्रकरणाबाबत प्रश्न विचारला असता मोदींनी मोठ्या खुबीने यावर बोलणे टाळले. याबाबतचे कारण देखील त्यांनी संबंधित पत्रकाराला सांगितले.
एका पत्रकाराने नरेंद्र मोदी यांना विचारले की, उद्योगपती गौतम अदानी यांच्या लाच प्रकरणावर अमेरिकेत दाखल झालेल्या खटल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली का? यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत एक लोकशाही आहे आणि आपली संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम’ आहे, आम्ही संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो. प्रत्येक भारतीय माझा आहे असे मला वाटते. दोन देशांचे दोन सर्वोच्च नेते कधीही अशा वैयक्तिक मुद्द्यांवर चर्चा करत नाहीत.
दरम्यान, जो बायडेन अमेरिकेचे अध्यक्ष असताना अमेरिकेच्या न्याय विभागाने दाखल केलेल्या खटल्यात गौतम अदाणी यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. आरोपांनुसार, सौरऊर्जेच्या करारांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी अदाणी यांनी भारतीय अधिकार्यांना सुमारे 2,100 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हे व्यवहार अमेरिकन बँका आणि गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवण्यात आले होते ज्यांच्याकडून अदाणी समूहाने अब्जावधी डॉलर्स उभारले आहेत. दरम्यान, ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर अशी प्रकरणे व्यवस्थित हाताळण्यासाठी कायद्यात काही बदल करण्यास सूचवले आहे.